अकरावी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:52+5:302021-07-17T04:09:52+5:30
पुणे : राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून येत्या सोमवारपासून (दि.१९) प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. ...
पुणे : राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून येत्या सोमवारपासून (दि.१९) प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. तसेच येत्या २१ ऑगस्टपर्यंत सीईटी घेण्याचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार असल्याचे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांवर सीईटी परीक्षा अवलंबून असेल जाहीर करण्यात आले. मात्र, निकाल जाहीर झाला, प्रवेश प्रक्रिया केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम होता. परंतु, येत्या सोमवारपासून या प्रक्रियेस सुरुवात केली जाईल. सीईटी परीक्षा ऐच्छिक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सीईटी परीक्षेसाठी अभ्यास साहित्य दिले जाणार नाही. परंतु, कोणत्या घटकांवर परीक्षा घेतली जाईल, याची माहिती मंडळातर्फे दिली जाईल. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी सुमारे १७० रुपये शुल्क आकारले जाईल. राज्य मंडळाने सीईटी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक तयारी केली आहे. त्यामुळे येत्या २१ ऑगस्टपर्यंत सीईटी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.