अकरावी गुण व अंतर्गत मूल्यमापनावर बारावीचा निकाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:06+5:302021-06-21T04:09:06+5:30
पुणे : बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर, निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा; याबाबत शिक्षण विभागातर्फे विविध पातळ्यांवर चर्चा केली जात ...
पुणे : बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर, निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा; याबाबत शिक्षण विभागातर्फे विविध पातळ्यांवर चर्चा केली जात असून, अकरावीचा निकाल व बारावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीच्या अंतिम निकाल जाहीर करावा, सीबीएसईचे सूत्र जसेच्या तसे अमलात आणण्याची आवश्यकता नाही, अशा सूचना रविवारी (दि.२०) घेण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत मांडण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. सीबीएसईने इयत्ता दहावी अकरावी आणि बारावी या तीनही वर्गातील गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंडळानेही बारावीचा निकाल जाहीर करण्याबाबत शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याबरोबर चर्चा केली. रविवारी सुद्धा याबाबत बैठक घेण्यात आली.
राज्यातील तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. बारावीच्या गुणांच्या आधारे केवळ विद्यापीठ स्तरावरील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. उर्वरित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन त्यात प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे बारावीचा निकाल नेमका कोणत्या पद्धतीने प्रसिद्ध केला जाणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे.
--------------------
दहावीचे गुण ग्राह्य धरावेत
इयत्ता अकरावीमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण आणि विद्यार्थ्यांच्या इयत्ता बारावीमधील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर करावा, अशा सूचना रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत मांडण्यात आल्या. काही प्राचार्य व तज्ज्ञांनी दहावीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण सुध्दा निकालासाठी ग्राह्य धरावे, अशी भूमिका मांडली. तर काहींनी यास विरोध केला,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.