पुण्यात पुन्हा एल्गार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:03+5:302020-12-24T04:11:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तीन वर्षांपूर्वी शनिवार वाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेवरुन देशभर मोठा वादंग झाल्यानंतर आता पुन्हा पुण्यात ...

Elgar conference again in Pune | पुण्यात पुन्हा एल्गार परिषद

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तीन वर्षांपूर्वी शनिवार वाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेवरुन देशभर मोठा वादंग झाल्यानंतर आता पुन्हा पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या वतीने परवानगीसाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथील लढाईला २०० वर्ष होत असल्याच्या निमित्ताने शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे मोठी दंगल झाली. त्याचे महाराष्ट्रासह देशभर पडसाद उमटले होते. या परिषदेच्या आयोजनात बंदी असलेल्या माओवादी संघटनांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यातून देशभरातील अनेक डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासाचा आढावा घेण्याची सूचना केल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पुणे पोलिसांकडील हा तपास ‘एनआयए’कडे सोपविला आहे.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले की, एल्गार परिषद हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याला अकारण बदनाम केले गेले आहे. कोरेगाव-भीमा येथे दरवर्षी देशभरातून हजारो कार्यकर्ते येत असतात. धर्म, पंथ, राजकीय भेद सोडून सांस्कृतिक जागर करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. साने गुरुजी स्मारक येथे दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात येत्या ३१ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आम्ही गणेश कला क्रीडा मंचचे आरक्षण केले आहे. या परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे.

चौकट

अद्याप परवानगी नाही

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी सांगितले की, ‘ लोकशासन आंदोलन’ या संस्थेकडून परिषदेला परवानगी मागणारा अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

Web Title: Elgar conference again in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.