एल्गार परिषद ३० जानेवारीला घेणारच, परवानगी नाकारल्यास रस्त्यावर घेणार- कोळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:52 AM2021-01-01T00:52:12+5:302021-01-01T06:58:26+5:30
परवानगी नाकारल्यास रस्त्यावर घेणार
पुणे : धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांभोवती राजकारण फिरावे, या हेतूने आम्ही काम करीत आहोत. हा संदेश देशभर जाण्यासाठी एल्गार परिषद आयोजित केली होती. परंतु, ब्राह्मण्यवाद्यांनी या परिषदेला बदनाम केले. आम्ही मागे हटणार नाही. येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्याचे आम्ही ठरवले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तर आम्ही रस्त्यावर ही परिषद घेऊ, असा निर्धार निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे - पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद घेण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे एल्गार परिषदेची नवी तारीख पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आली. लाल सेनेचे गणपत पिसे, बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
एल्गार परिषदेला राज्यातील अडीचशे संघटनांचा पाठिंबा असल्याचे या वेळी सांगण्यात आले. कोळसे - पाटील यांनी सांगितले की, कोेरेगाव भीमाच्या लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २०१७ मध्ये एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा काही संबंध नसतानाही एल्गार परिषदेला बदनाम करण्यात आले.