एल्गार परिषद : शरजिल उस्मानीची दुसर्यांदा पोलीस ठाण्यात हजेरी; सुमारे चार तास कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 09:28 PM2021-03-18T21:28:47+5:302021-03-18T21:28:59+5:30
शरजिल उस्मानीने एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण केले होते.
पुणे : एल्गार परिषदेतील भडकाऊ भाषणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी आज दुसर्यांदा पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी त्याच्याकडे सुमारे ४ तास प्राथमिक चौकशी करुन पोलिसांनी जबाब नोंदविल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर यांनी दिली.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत त्याने भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करुन प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी उस्मानीवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शरजिल उस्मानीने न्यायालयात सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझ्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा असे उस्मानीने याचिकेमध्ये नमूद केले होते.पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करता उस्मानीचा जबाब नोंदवून घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच उस्मानी याला स्वारगेट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार मागील आठवड्यात उस्मानी हा १० मार्च रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात पहिल्यांदा चौकशीसाठी उपस्थित राहिला होता. मात्र आणखी काही माहिती हवी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी पुन्हा स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये शरजील उस्मानी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आला. पोलिसांनी जवळपास ४ तास त्याची चौकशी केली. त्यानंतर उस्मानी पोलीस स्थानकामधून बाहेर पडला.