पुण्यातील एलरो, युनिकॉर्न पबला पोलिसांनी ठोकले टाळे; मालकासह ४ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 10:31 AM2024-04-09T10:31:52+5:302024-04-09T10:32:25+5:30
रात्री १.३० नंतर सुद्धा डीजे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्याने गुन्हे शाखेने केली कारवाई...
- किरण शिंदे
पुणे : पुणेपोलिसांनी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या एलोरो आणि युनिकॉन या नामांकित पबवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही पबमधील साऊंड सिस्टिम आणि इतर असे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. याशिवाय हॉटेलच्या मालकासह चार जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अमन शेख, संदीप सहस्रबुद्धे, रश्मी कुमार, सुमित चौधरी आणि प्रफुल गोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रात्री १.३० नंतर सुद्धा डीजे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्याने गुन्हे शाखेने केली कारवाई. या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टिम, हुक्का पॉट यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही पब मधून पोलिसांनी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी शहरातील हॉटेल पब, बार यांना आस्थापना सुरू ठेवण्यासाठी रात्री १.३० पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत एलरो आणि युनिकॉर्न हाऊस हे दोन्ही पब रात्री १.३० नंतर सुद्धा सर्रास सुरू होते. भल्या मोठ्या डी जे साऊंड सिस्टिमने नागरिक हैराण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई केलीय. पुण्यातील हे दोन्ही नामांकित पब आता पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत