‘लॉग इन आयडी’चा वापर करून साडेतीन कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:11+5:302021-09-05T04:14:11+5:30
पुणे : कंपनीतील सहकारी कर्मचाऱ्याच्या ‘लॉग इन आयडी’चा वापर करून ३ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार करीत आरोपीने या ...
पुणे : कंपनीतील सहकारी कर्मचाऱ्याच्या ‘लॉग इन आयडी’चा वापर करून ३ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार करीत आरोपीने या रकमेतून चक्क आलिशान कार, फ्लॅट, दुचाकी व दागिन्यांची खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आदित्य राजेश लोंढे (वय २९, रा. यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आदित्य लोंढेसह कार्तिक गणपती ऊर्फ कार्तिक सुब्रमणियम व इतर बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल रतनलाल कौल (वय ४१) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आरोपींनी कंपनीत काम करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या ‘लॉग इन आयडी’चा गैरवापर करून कंपनीच्या तीन कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी आदित्य लोंढे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी कार्तिक याने आदित्य याच्या बँक खात्यात २ कोटी ३७ लाख ८७ हजार रुपये पाठविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी अपहार केलेल्या तीन कोटी ६८ लाख रुपयांमधून आदित्य याने कोंढवा येथून ६६ लाख ३ हजार ७७७ रुपयांची आलिशान कार, उंड्री येथील गृहप्रकल्पात लिना फिलिप्स व लिंडा फिलिप्स यांच्या नावे सदनिका, याशिवाय सोन्याचे दागिने आणि दुचाकीची खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्या बँक खात्यावर परदेशातून पैसे जमा झाले असून, गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.