शिवाजीराव भोसले बँकेत ४९६ कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:27+5:302021-09-16T04:16:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आतापर्यंत ठेवीदारांच्या एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आतापर्यंत ठेवीदारांच्या एकूण ४९६ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी विशेष एमपीआयडी न्यायालयाचे न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात ७ हजार ३८० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
शिवाजीराव भाेसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात चेअरमन आमदार अनिल भोसले, संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश भोसले, मंगलदार बांदल, हितेन ऊर्फ हितेंद्र पटेल आणि मनोजकुमार अब्रोल अशा ७ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या ७ जणांसह एकूण १६ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी पूर्व नियोजित गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून, संगनमताने व एकमेकांना साहाय्य करून कर्ज प्रकरणांचे मौल्यवान दस्तऐवज खोटे व बनावट करून ते दस्तऐवज खरे म्हणून वापरून, बनावट व खोटी कर्ज प्रकरणे केली. त्या कर्ज प्रकरणातून ठेवीदारांनी बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवींच्या रकमांचा लबाडीने अपहार करुन ठेवीदारांची फसवणूक केली आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत अनियमिता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादून २०१८ - १९ या आर्थिक वर्षाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला होता. या लेखापरीक्षणात अनेक गंभीर बाबी आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. या लेखापरीक्षणात अनेक बनावट नोंदी आणि ७१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात यामध्ये एकूण ४९६ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस हवालदार महेश मते, कोमल पडवळ, यांनी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.