पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 01:07 PM2020-06-04T13:07:02+5:302020-06-04T13:07:25+5:30
पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची उडाली धांदल
पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात मंगळवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची त्रेधा उडाली असून अद्यापही आपत्ती व्यवस्थापन कक्ष ढेपाळलेलाच असल्याचे दिसून आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. तर, अधिकारीही फोन घेत नसल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे शहरात पूर आला होता. सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोंढवा-हडपसर, वानवडी, येरवडा, वडगाव शेरी आदी भागात पूर आला होता. सर्वाधिक नुकसान आंबील ओढा आणि त्यालगतच्या परिसराचे झाले होते. या पुरात २८ पेक्षा अधिक बळी गेले होते. यासोबतच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नाल्याबाहेर असलेल्या रस्त्यांवरून तसेच सोसायटयांमध्ये जवळपास १२ ते १५ फुटांपर्यंत पाणी होते. अनेकांचे वाहून गेलेले संसार अद्यापही सावरलेले नाहीत. शेकडो सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या आहेत. त्या आद्यपही तशाच पडून आहेत. एकंदरीतच पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणारे काम होऊ न शकल्याने नागरिक धास्तावलेले आहेत.
त्यातच, पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा केवळ नावापुरताच आहे की काय अशी स्थिती आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता हा कक्ष असला तरी कक्षातील फोन मात्र उचलला जात नाही. या विभागाचे अधिकारीही फोन घेत नसल्याने नागरिकांना माहिती द्यायची असल्यास अग्निशामक दल किंवा पोलिसांना फोन करावा लागतो. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाकडील १५ पथके तैनात करण्यात आल्याचे आणि त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे संजय गावडे यांनी सांगितले. व्हेईकल डेपो आणि संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून मुख्य खात्याकडून तसेच आयुक्त स्तरावरून सर्वांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आपत्ती व्यवस्थापन विभाग क्षेत्रीय कार्यालयांवर जबाबदारी टाकून मोकळे होत असल्याचे चित्र आहे.
आपत्ती व्यवस्थापनची किती पथके आहेत, त्याचे नियंत्रण कोण करते आहे, पावसाळ्यात गेल्या वर्षीप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास नेमका काय 'प्लॅन' आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
------------------
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे याची माहिती दिली जाणार आहे. कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाईन आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरण्यात येणारी असून स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला एकत्रित नियंत्रण कक्ष केला जाईल. यासोबतच मलवाहिन्या, नाले आणि चेंबर्सची स्वच्छता झाली आहे. जवळपास १६ हजार चेंबर्स स्वच्छ करण्यात आले आहेत. कात्रज तलावातील गाळ काढून खोलीकरण आणि बंधाऱ्यांची उंची वाढविण्यात आली आहे. आंबील ओढ्याच्या स्वच्छतेसह पावसाळापूर्व कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत.
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका
-------------
सगळा भार पुन्हा अग्निशामक दलावर
वडगाव शेरी, येरवड, शांतीनगर, हडपसर साडे सतरानळी आदी आठ ते नऊ ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. यासोबतच संध्याकाळी पाच पर्यंत शहराच्या विविध भागात झाडपडीच्या ६० पेक्षा अधिक घटना घडल्या. या सर्व कॉल्सवर अग्निशामक दलाचे जवान गेले होते. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उचलला जात नसल्याने सर्व भार अग्निशामक दलाच्या जवानांवरच आला.