ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप

By admin | Published: September 23, 2015 03:18 AM2015-09-23T03:18:55+5:302015-09-23T03:18:55+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करीत मंगलमय वातावरणामध्ये पाच दिवसांच्या गणरायाला व गौरीला पवनानगर परिसरामध्ये वाजत-गाजत भावपूर्ण निरोप दिला.

Emotional dances in the drumsticks | ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप

ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप

Next

पवनानगर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करीत मंगलमय वातावरणामध्ये पाच दिवसांच्या गणरायाला व गौरीला पवनानगर परिसरामध्ये वाजत-गाजत भावपूर्ण निरोप दिला.
पवनानगर परिसरामध्ये गणरायास मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये निरोप देण्यात आला. परंतु, ग्रामीण भागामध्ये गावातील प्रत्येक घरामध्ये गणरायाची भक्ती व सेवा करता यावी, म्हणून गणपती बसवला जातो. आज अनेक गावांमध्ये गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत निरोप देण्यात आला. शिवली, ठाकूरसाई, काले, पवनानगर, ब्राह्मणोली या गावांतील नागरिकांनी पवना धरणाच्या काठावर वाजत-गाजत नेऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले, तर कोथुर्णे, येळसे, शिवली, शेवती वसाहत, काले या गावातील नागरिकांनी पवना नदीच्या काठावर विसर्जन केले. तर महागाव, धालेवाडी, मालेवाडी या गावांमध्ये धालेवाडी तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांसह तरुण व मोठ्या नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. तर महिलांनी गौरींना निरोप दिला. या वेळी प्रत्येक गावातील महिलांना जागोजागी फेर धरला. फुगड्या खेळत, तसेच मंगळागौरीची गाणी म्हणत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. या परिसरातील अनेक गावांमध्ये ढोल-लेझीम पथके आहेत.
या ढोलांना पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण या भागातून गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या ढोलामध्ये गावातील अनेक तरुण सहभागी असतात. त्यामुळे मिरवणुकीत तरुणांची संख्या कमी जाणवत होती.
कार्ल्यातही उत्साह
कार्ला : कार्ला परिसरातील पाटण वेहेरगाव दहिवली येथील गणपतीचे ढोल-ताशांच्या गजरात व तरुणांच्या थरकत्या तालावर पाच दिवसांच्या गणपतीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले.
दुपारी चारला कार्ल्यात मारुती मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात व बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. विठ्ठल-रुक्मिणी, महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून मिरवणूक पुन्हा मारुती मंदिराजवळ आली. थोडा वेळ मारुती मंदिराजवळ मिरवणूक थांबली. या वेळी गावातील घराघरातील गौरींचे मंदिरासमोर आगमन झाले. या वेळी महिलांचा उत्साह मोठा होता. महिलांनी फेरधरून गौरीची गाणी म्हणायला सुरुवात केली. मंदिरासमोर अतिशय भावमय व भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले. या वेळी तरुणांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. नंतर मिरवणूक इंद्रायणी नदीकडे निघाली. या वेळी गावातील सर्व आबालवृद्ध व महिला या मिरवणुकीत सामील झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Emotional dances in the drumsticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.