वाजतगाजतपेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:16+5:302021-07-12T04:08:16+5:30
पुणे : शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करून विवाह सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली असली, तरी विवाहावर ...
पुणे : शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करून विवाह सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली असली, तरी विवाहावर अमाप खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच जोडप्यांचा कल आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने ५ हजार २२२ विवाह झाले. मात्र, अजूनही कोरोना आणि नोकरीच्या अस्थिरतेची टांगती तलवार असल्याने नोंदणी विवाहालाच जोडप्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत नोंदणी पद्धतीने ३ हजार ६१२ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ पार पडले आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे विवाह समारंभावर अनेक निर्बंध लागू केल्यामुळे पाचशे ते हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्यावर बंधने आणली. विवाहासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घातल्याने एकाला बोलावले आणि दुस-याला नाही यातून नातेवाईक, मित्रमंडळी दुखावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडप्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दर्शविली आहे. यातच विवाहाच्या बाबतीत येणा-या परवानग्यांच्या अडचणी, नियमावली आणि खर्च याला बगल देण्यासाठी नोंदणी विवाहाचा पर्याय जोडप्यांनी स्वीकारला आहे.
-----------------
यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्याला हवी ती तारीख निवडून जोडपी विवाहबद्ध होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही निर्बंध असल्यामुळे फक्त मे महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या घटली. परंतु, जूनमध्ये पुन्हा ते प्रमाण वाढले . हे प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्साठीची प्रक्रिया खूप सुटसुटीत आहे. सध्या ५० जणांच्या उपस्थितीत विवाह करणाऱ्याची परवानगी असली तरी नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या घटलेली नाही.
- डी. ए. सातभाई, विवाह नोंदणी अधिकारी
----------------------------
मुलीचा विवाह ठरविल्यानंतर तो रीतसर मंगल कार्यालयात करायचा की नोंदणी पद्धतीने विवाह करायचा यावर कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर सर्वांचेच एकमत झाले. वराकडच्या मंडळींनी देखील होकार दर्शविला. पोलीस परवानगी घ्यायची, विवाहाला येणाऱ्या नातेवाईकांची जबाबदारी घ्यायची, त्यापेक्षा नोंदणी विवाह करणे केव्हाही योग्य आहे, असे वाटले.
- विनायक सप्रे, पालक
---------------------
गतवर्षी आणि यंदा सहा महिन्यांतील नोंदणी विवाह
महिना 2020 2021
जानेवारी 686 668
फेब्रुवारी 736 671
मार्च 336 692
एप्रिल - 507
मे 84 482
जून 199 592
जुलै 383
आॅगस्ट 439
सप्टेंबर 429
आॅक्टोबर 544
नोव्हेंबर 562
डिसेंबर 832
---------------------------------------------------------------
एकूण 5222 3612
---------------------------------