विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:49 PM2022-04-04T19:49:43+5:302022-04-04T19:52:17+5:30
राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला आहे. मशीदवरील भोंगे पाहिजेत. अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशारा राज ठाकरे यांनी शनिवारी दिला होता. यावरून महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले आहेत. त्यातच पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका मनसैनिकाने राजीनामा दिल्याचे पत्र नगरसेवक वसंत मोरे यांना पाठवले आहे.
पत्रात काय नमूद केले
मी माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८ आपणास या पत्राद्वारे कळवत आहे कि, मागील काही दिवसात पक्षात विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे मुद्दे सोडून जात - धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी माजिद अमीन शेख कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारून याची पोहोच द्यावी हि विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातून एका मनसैनिकाने राजीनामा दिल्याने सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे राज ठाकरे आता जाती धर्म या विषयावर का भर देत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नकला करून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का?अजित पवारांनी केला होता प्रश्न
राज ठाकरे नुसती पवार साहेबांवर टीका करतात, एकेकाळी पवार साहेब यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी कौतुक केलं अन् आता टीका करतात. मुलाखत घेतली त्यावेळेस पवार जातीवादी वाटले नाहीत. आताच त्यांना जातीवादी वाटायला लागले. पवार साहेब आताच राजकारणात नाहीत. याचं जन्म नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारण करायला लागले आणि त्यामुळे अशा लोकांनी टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याच्याकडे एक नकलाकार म्हणून पाहिल जात. नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल ठाकरे यांनी पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.