कृतिशील शिक्षणावर भर हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:07+5:302021-01-17T04:10:07+5:30
पंडित विद्यासागर : गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान पुणे : सध्याच्या शिक्षणपद्धतीत पाठांतरावर जास्त भर आहे. भविष्यातली आव्हाने पेलण्यासाठी ही पद्धत ...
पंडित विद्यासागर : गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान
पुणे : सध्याच्या शिक्षणपद्धतीत पाठांतरावर जास्त भर आहे. भविष्यातली आव्हाने पेलण्यासाठी ही पद्धत कुचकामी आहे. त्यामुळे नव्या जमान्यासाठी नवी शिक्षणप्रणाली अवलंबवावी लागेल. त्यासाठी संकल्पनात्मक शिक्षण, कृतिशील शिक्षण या गोष्टींवर भर द्यायला हवा, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यासागर बोलत होते. स्वामी कृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात बृहन्महाराष्ट्र कॉमर्स ऑफ कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत रावळ यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य अ.गो. गोसावी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अशोक कामत आदी उपस्थित होते.
डॉ.रावळ म्हणाले, ‘येणारे जग हे स्पर्धेचे आहे. ही स्पर्धा एकाच वेळी स्थानिक महाविद्यालयाशी, विद्यापीठांशी आणि परदेशी विद्यापीठांशी आहे. त्यामुळे शिक्षणप्रक्रियेत बदल हवेतच. भारताची आधुनिकता जगाला नाकारता येणार नाही. कोरोनामुळे जगभरात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारताची लोकसंख्या भविष्यात ‘ॲसेट’मध्ये कशी रूपांतरित करता येईल, हेच भविष्यातील मोठे आव्हान आहे.’
डॉ.रवींद्र कोठावदे यांनी निवेदन केले. डॉ.भालचंद्र कापरेकर यांनी आभार मानले.