आंबेगाव तालुक्यात लसीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:27+5:302021-04-09T04:11:27+5:30
घोडेगाव: आंबेगाव तालुक्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून ४५ वर्षांच्या वरील नागरिकांचे लसीकरण वाढविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस ...
घोडेगाव: आंबेगाव तालुक्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून ४५ वर्षांच्या वरील नागरिकांचे लसीकरण वाढविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत शनिवार व रविवार गरज असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडा, या दोन दिवशी कडक लॉकडाऊन पाळला जाणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील सरपंच, पोलिस पाटील व ग्रामसेवक यांची तहसीलदार रमा जोशी यांनी ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीत सरपंच, ग्रामसेवक , पोलिस पाटील यांच्या सूचनांचे निरसन केले. या बैठकीत ब्रेक द चेनमध्ये आस्थापना वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. रमा जोशी म्हणाल्या, शनिवार, रविवार लॉकडाउनचे नियोजन केले आहे. खासगी वाहनेसुध्दा या दोन दिवसांत बंद राहातील. तातडीची वैद्यकीय गरज असले तरच त्या व्यक्तीला सोडले जाणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीसुध्दा कोरोना सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल.
या वेळी ४५ वर्षांच्यावरील लोकांचे लसीकरण करण्यासंदर्भात सर्व सरपंचांना सूचना देण्याला आल्या. पोलीस पाटील, तलाठी व मंडल अधिकारी यांनी प्रत्येक गावात बैठक घेऊन लसीकरणाची व होमआयसोलेशन संदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. गावात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये गर्दी होत असेल व याची माहिती पोलिस पाटलांनी दिली नाही तर त्या पोलिस पाटलाचे निलंबन केले जाईल. यासाठी पोलिस पाटलांनी सतर्क रहा व प्रशासनाला खरी माहिती द्या, असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.
सरपंचांनी लग्नाला जाऊ नका व गर्दी करणाऱ्या कार्यक्रमांना पाठीशी घालू नका. तसेच लग्नामध्ये उपस्थित असलेल्या लोकांची कोरोना चाचणी केली असल्याचा रिपोर्ट जवळ असावा, नसल्यास कार्यमालकावर कारवाई केली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले.
चौकट
तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांचे लसीकरण केले जावे, कारण घरोघरी सर्व्हेच्या कामात ग्रामपंचायत सदस्य शासकीय यंत्रणेला मदत करत असतात, यासाठी यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तसेच लोक लसीकरणासाठी जात आहेत अशा वेळी लस कमी पडू नये, अशी मागणी घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे यांनी केली.