सारस्वतांच्या मानधनावरून रंगला कलगीतुरा, संमेलन आटोपशीर करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:54 PM2017-11-19T23:54:02+5:302017-11-19T23:54:42+5:30

मराठी सारस्वतांचा मेळा अशी खासियत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये लेखक, साहित्यिकांनी प्रवास खर्च आणि मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेने केले

Emphasize on coloring and colorful editing of the Saraswatra | सारस्वतांच्या मानधनावरून रंगला कलगीतुरा, संमेलन आटोपशीर करण्यावर भर

सारस्वतांच्या मानधनावरून रंगला कलगीतुरा, संमेलन आटोपशीर करण्यावर भर

Next

प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : मराठी सारस्वतांचा मेळा अशी खासियत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये लेखक, साहित्यिकांनी प्रवास खर्च आणि मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेने केले आहे. या पार्श्वभूमीवर लेखकांना मानधन मिळावे की नाही, या मुद्द्यावरून साहित्यक्षेत्रात कलगीतुरा रंगला आहे. महामंडळाच्या अध्यक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असतानाच, संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांचा मानधन देऊन सन्मान का होऊ नये, असा सवालही उपस्थित केला जात आहे. यंदा संमेलनातील निमंत्रितांची संख्या १८० वरून निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी समाजमनाचा मानबिंदू मानला जातो. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा विविध विषयांवर सांगोपांग चर्चा घडून येते. साहित्याची परंपरा समृद्ध व्हावी, नवनवीन विषयांवर विचारमंथन व्हावे, यादृष्टीने अनेक लेखक, साहित्यिक संमेलनाला आवर्जून हजेरी लावतात. संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येणाºया मान्यवरांचा प्रवास खर्च, निवास आणि भोजनव्यवस्था, तसेच मानधनाचा खर्च आयोजकांकडून केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाने कोटींची उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. संमेलनाचा खर्च आटोक्यात यावा, यादृष्टीने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर संमेलनासाठी निमंत्रितांनी मानधनाचा त्याग करावा व प्रवासखर्चही ज्याचा त्याने करावा, असे आवाहन केले होते. माझ्या भूमिकेचा पुरस्कार करणारे आयोजक बडोद्याच्या संमेलनाला लाभले याचा मला आनंद आहे. निमंत्रित सहभागींनी आयोजकांच्या या अपेक्षेला उत्साहाने प्रतिसाद दिल्यास संमेलन संस्कृतीला इष्ट वळण लाभू शकते,’ असे मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.
याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘साहित्य संमेलनामध्ये मान्यवर साहित्यिकांना मानधन मिळायला हवे. आयोजकांनी इतर खर्चांना कात्री लावून मराठी सारस्वतांचा अगत्यपूर्वक सन्मान करण्यास काहीच हरकत नाही. दर वर्षीपेक्षा निमंत्रितांची संख्या कमी करण्यात आल्याने मसापतर्फे ३० ऐवजी यंदा आठ-दहा जणांनाच संधी मिळणार आहे.’
साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष म्हणाले, ‘महामंडळाचे अध्यक्ष संमेलन व महामंडळाच्या बैठकीसाठी स्वखर्चाने फिरत असतील तर महामंडळाच्या अन्य पदाधिकाºयांनीही सुरुवात स्वत:पासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी, संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये. या निर्णयाची अंमलबजावणी करून साहित्यिक व वाचकांच्यासमोर योग्य तो संकेत जाईल.’
>संमेलनाचा खर्च आटोक्यात आणायचा असेल तर मानधन व प्रवासखर्चाचा लेखकांनी त्याग करायला काहीच हरकत नाही. डोंबिवलीच्या संमेलनातही आयोजकांना याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडे पैसा असल्याने त्यांनी हे अमान्य केले. बडोद्यातील आयोजक संस्था लोकाश्रयावर आटोपशीर संमेलन घेण्याचा प्रयत्न करत आहे, तो स्वागतार्ह आहे. संमेलनाचा लेखकवर्ग हळूहळू बदलत आहे. त्यामुळे त्यांची मानधनाचा त्याग करण्यास हरकत नसावी. मी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यापासून स्वखर्चाचे गणित पाळतो आहे. - डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
>आयपीएलमध्ये क्रिकेटपटूंना तसेच नाट्यसंमेलनामध्ये कलावंतांना मानधन मिळते. मग, साहित्य संमेलनामध्ये लेखकांना मानधन का मिळू नये? मराठी सारस्वतांचा अगत्यपूर्वक सन्मान व्हायला काहीच हरकत नसावी. आयोजकांनी इतर खर्च कमी करून मानधन द्यावे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप
>संमेलनात सहभागी होणाºया मान्यवरांनी मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याची सुरुवात महामंडळाच्या पदाधिकाºयांनी स्वत:पासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी व संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये, असे मला वाटते. या निर्णयाची अंमलबजावणी करून साहित्यिक व वाचकांच्यासमोर योग्य संकेत जाईल.
- सुनील महाजन,
माजी कोषाध्यक्ष, साहित्य महामंडळ

Web Title: Emphasize on coloring and colorful editing of the Saraswatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे