ऑनलाईन परीक्षांवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:46+5:302021-03-24T04:11:46+5:30
पुणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यावर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे ...
पुणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यावर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिल्या.
राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते. राज्यातील सर्व विद्यापीठांकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत नियोजन केले जात आहे.त्यानिमित्ताने सामंत यांनी सर्व कुलगुरूंशी संवाद साधला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार असून या परीक्षांचा सामंत यांनी आढावा घेतला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. किती विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, वेळापत्रक केव्हा प्रसिध्द केले जाईल,ऑनलाइन परीक्षा कोण घेणार अशा विविध मुद्द्यांवर सामंत यांनी चर्चा केली. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या, असे सूत्रांनी सांगितले.
--
पुणे विद्यापीठातर्फे रविवारी सुध्दा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, विविध पदरभरती संदर्भातील परीक्षा या रविवारी होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यादृष्टीने विद्यापीठाकडून परीक्षांचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही परीक्षेपासून वंचित राहणार नाही.