समाविष्ट गावांत खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ते गेले वाहून, दाद मागायची तरी कोणाकडे?
By भालचंद्र सुपेकर | Published: July 20, 2023 04:27 PM2023-07-20T16:27:14+5:302023-07-20T16:27:44+5:30
रस्ते आणि ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय
पुणे : आधीच्या नगरसेवकांची मुदत संपली आहे आणि निवडणुका लांबल्याने नवे नगरसेवक नाहीत. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट गावांना कुणी वालीच उरलेला नाही. रस्ते आणि ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसामुळे झालेला चिखल आणि डबकी यांची भर पडली आहे. त्यामुळे या नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे? असा सवाल उपस्थित होत आहे.
समाविष्ट गावांमध्ये धायरी, नऱ्हे, आंबेगाव आणि इतर भागांमध्ये जागोजागी रस्ते आणि ड्रेनेजची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी पाऊस सुरू होण्याआधीपासूनच मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. महिना उलटत आला तरी तिथे काम सुरू झालेले नाही. शासनाच्या नियमानुसार जिथे काम सुरू असेल तिथे कामाचे नाव, ठेकेदाराचे नाव, कामासाठीचा अंदाजित खर्च, काम पूर्ण करण्याची मुदत याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. परंतु, अनेक ठिकाणी असे फलकच लावलेले नाहीत.
प्रशासनाचे दुर्लक्ष
सध्या नगरसेवक नसल्याने पालिकेचा कारभार प्रशासन चालवीत आहे. परंतु, प्रशासनाने या कामांकडे दुर्लक्ष केले असून त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत वेगाने कार्यवाही करवी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
माजी नगरसेवकांची ‘चमकोगिरी’
प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा माजी नगरसेवक पुरेपूर फायदा घेत आहेत. ‘मी आयुक्तांना सांगतो’, ‘मी ठेकेदाराला उद्याच बोलावतो’, असे सांगून माजी नगरसेवक फक्त चमकोगिरी करीत आहेत. येत्या निवडणुकीत आपले मतदार दूर जाऊ नयेत, यासाठीची त्यांची ही खेळी असल्याची चर्चा आहे.
रायकर मळ्याच्या रस्त्याची दुरवस्था
मारुती मंदिराकडून रायकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यात विठ्ठल संगम सोसायटीजवळ रस्ता रुंदीकरणासाठी महिनाभरापासून मोठा खड्डा खोदला आहे. त्यामुळे हा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून पाण्याचे टँकर, खडीचे डंपर सतत जात असतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी येथे प्रचंड वाहतूककोंडी होते. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. मुळात या ओढ्यावरील पुलाचे कठडे दोन वर्षांपूर्वी पावसात वाहून गेले होते. त्या जागी नवा पूल बांधण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. पुलाचे काम झाले. परंतु, रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले. ते काम पूर्ण करण्यासाठी मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. हे काम गेल्या सुमारे महिनाभरापासून बंद आहे. याचा या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत असून महापालिका प्रशासनाने हे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.