कामगारांची माहिती दडवली
By Admin | Published: January 29, 2015 11:39 PM2015-01-29T23:39:50+5:302015-01-29T23:39:50+5:30
कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगीक वसाहतीतील कारगील इंडिया कंपनीतील कामगारांची माहिती दडवल्याप्रकरणी कंपनीतील दोन अधिकाऱ्यांसह ६ कामगार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले
दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगीक वसाहतीतील कारगील इंडिया कंपनीतील कामगारांची माहिती दडवल्याप्रकरणी कंपनीतील दोन अधिकाऱ्यांसह ६ कामगार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली.
कारगील कंपनीचे मॅनेजर विजय कामत (रा. वानवडी, पुणे), सुपरवायझर सुनिल भंडारी (रा. टाकळी खंडेश्वर ता. कर्जत, जि. अहमदनगर), कामगार ठेकेदार निवृत्ती कांबळे (रा. कुरकुंभ, ता. दौंड), राजेंद्र मलबारे (रा. केडगाव, ता. दौंड), विनयकुमार मिस्त्रा (रा. ताडीवाला रोड, पुणे), तुळशीराम पांडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड), नागेंद्र प्रभु (रा. कुरकुंभ, ता. दौंड), विलास वायाळ (रा. बिरोबावाडी, ता. दौंड) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत छोट्या मोठ्या ७५ कंपन्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर कंपनीतील काम करणाऱ्या कामगारांची माहिती दौंड पोलिसांनी मागवली होती. परप्रांतीय तसेच अन्य जिल्ह्यातील काही कामगार गुन्हे करुन निघुन जातात़ सध्याच्या परिस्थितीत दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालमत्तेच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. तेव्हा खबरदारीचे उपाय म्हणुन औद्योगीक वसाहतीतील कंपन्यांना कामगार पुरविणारे ठेकेदार तसेच कंपन्यातील अधिकाऱ्यांची २४ डिसेंबर २०१४ रोजी दौंड पोलीस स्टेशन मध्ये बैठक बोलावली होती़ या बैठकीत कंपनीतील कामगारांची माहिती तसेच त्यांचे चारित्र्य पडताळणी करुन घेण्याच्या सुचना संबधितांना पोलिसांनी दिल्या होत्या. तसेच कारगील कंपनीत २४ ठेकेदारांकडून परप्रांतीय आणि राज्यातील ८६८ कामगार पुरविण्यात आले होते.