प्रशस्त इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता
By admin | Published: February 28, 2015 02:19 AM2015-02-28T02:19:41+5:302015-02-28T02:19:41+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत. येथील ८४ जागा रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचा-यांची कमतरता
मंगेश पांडे, पिंपरी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत. येथील ८४ जागा रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने काही पदांवर निवृत्त कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक करण्यात आली आहे. यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जीवावरच प्राधिकरणाचा गाडा सुरू आहे. इमारत प्रशस्त, पण कर्मचाऱ्यांची कमतरता अशी अवस्था प्राधिकरण कार्यालयाची झाली आहे.
आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ ४२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पर्यावरणपूरक सात मजली इमारतीचे उद्घाटन ८ फेबु्रवारी २०१३ ला झाले. या इमारतीतून प्राधिकरणाचा कारभार चालत असला, तरीही पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
प्राधिकरणात सुरुवातीला मोठी कर्मचारीभरती झाली. त्यानंतर अद्याप मोठ्या प्रमाणात भरती झालेली नाही. दरम्यानच्या काळात बहुतांश कर्मचारी, अधिकारी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या जागी पुन्हा नव्याने भरती करण्यात आली नाही.
सध्या प्राधिकरणात भांडार विभाग, माहिती व जनसंपर्क, भू-विभाग, प्रशासन व अतिक्रमण निर्मूलन, अभियांत्रिकी, नियोजन विभाग, लेखा व वित्त, विद्युत आदी विभाग आहेत. मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या १९५ आहे. त्यातील ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रार येथील कर्मचाऱ्यांची आहे. सध्या प्राधिकरणातील १२ अधिकाऱ्यांवर त्यांच्या विभागासह इतर महत्त्वाच्या विभागांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मूळ जबाबदारी असलेल्या विभागाचेही कामकाज व्यवस्थितरीत्या पाहणे शक्य होत नाही.
तसेच भरती होत नसली, तरी कामकाज व्यवस्थित सुरू राहावे, यासाठी २० लिपिक कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले आहेत, तर प्राधिकरणातीलच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मानधन तत्त्वावर पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. यामध्ये ५८ ते ६५ वयोगटातील २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.