बीएसएनएलमधील सुधारणांसाठी कर्मचाऱ्यांचेच आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:06 AM2021-02-19T04:06:24+5:302021-02-19T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बीएसएनएल (भारत संचार निगम) मध्ये सुधारणा कराव्यात, या मागणीसाठी बीएसएनएलमधीलच कर्मचाऱ्यांनी पुणे-सातारा रस्त्यावर एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बीएसएनएल (भारत संचार निगम) मध्ये सुधारणा कराव्यात, या मागणीसाठी बीएसएनएलमधीलच कर्मचाऱ्यांनी पुणे-सातारा रस्त्यावर एक दिवसाचे उपवास आंदोलन केले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचारी एकत्रितपणे रस्त्यावर बसून होते.
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. निवृत्त कर्मचारी तसेच काढून टाकलेले कंत्राटी कामगार व ठेकेदार कंपन्याही यात सहभागी झाल्या होत्या. सरकार बीएसएनएल कंपनीला जाणीवपूर्वक मदत नाकारत आहे, त्यामुळे कंपनीची कार्यक्षमता कमी होऊन त्यातून ग्राहकांचा रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
कंपनीला ४-जी सुविधा व अत्यावश्यक ते तंत्रसाह्य त्वरित द्यावे, खासगीकरण प्रक्रिया तत्काळ थांबवावी, काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांना परत कामावर घेऊन कायम सेवेत घ्यावे, अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया लगेच सुरू करावी, वेतनवाढीची चर्चा सुरू करावी, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करावीत व कामगारांचे वेतन वेळेवर करत जावे या मागण्या करण्यात आल्या.
नागेश नलावडे, युसूफ जकाती, गणेश भोज, विलास कदम, संदीप गुळुंजकर, नितीन कदम, शशांक नायर, पंडित निगडे तसेच अन्य कर्मचारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.