कर्मचाऱ्यांना लोकसभेचे अजूनही मानधन नाही; अधिकाऱ्यांकडे दिलेले पैसे गेले कुठे, चौकशी करण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:28 PM2024-11-11T13:28:49+5:302024-11-11T13:29:46+5:30
नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे, जिल्हा निवडणूक शाखेचे स्पष्टीकरण
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पर्वती, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळालेच नसल्याचे उघड झाले आहे. मात्र, जिल्हा निवडणूक शाखेकडून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्याच वेळी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मानधन दिल्याबाबत चौकशी करू, असेही या वेळी सांगण्यात आले. या दोन मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे यात विलंब झाला असल्याची शक्यता शाखेकडून वर्तविण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा निवडणूक शाखेकडून जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार मतदारसंघांसाठी आठ हजार ४१७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३९ हजार ४२२ इतके अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या वेगवेगळ्या कामांसाठी करण्यात आली होती. जिल्ह्यात ७ व १३ मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणीही झाली.
आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या कामाचे दुसरे प्रशिक्षण घेण्यात येत आहे, तरीही लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी पर्वती, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप मानधनच मिळाले नसल्याची माहिती उघड झाली आहे.
याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यावेळीच देण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना दोन कोटी ७० लाख तर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील तीन तालुक्यांतील कर्मचाऱ्यांसाठी ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे मानधन राहिले नाही.
पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघातील त्या वेळी कार्यरत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नव्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मानधन दिले की नाही, याची चौकशी करू. अनेक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या त्यांच्या खात्याची चुकीची माहिती दिली असल्याने त्यांच्या रकमा परत आल्या आहेत. अनेकदा कर्मचाऱ्यांना मानधन किंवा जेवण असा मोबादला दिला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, किती कर्मचारी मानधनापासून वंचित आहेत, याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे माहिती नसल्याचे सांगण्यात आले.