गर्दीच्या वेळी कर्मचारी कमी
By admin | Published: February 10, 2015 01:28 AM2015-02-10T01:28:55+5:302015-02-10T01:28:55+5:30
खराळवाडी प्राथमिक उपचार केंद्रातील २ कर्मचारी ३ दिवस येथील केंद्रात काम करतात, तर ३ दिवस इतर रुग्णालयांमध्ये काम करीत
जमीर सय्यद, नेहरुनगर
खराळवाडी प्राथमिक उपचार केंद्रातील २ कर्मचारी ३ दिवस येथील केंद्रात काम करतात, तर ३ दिवस इतर रुग्णालयांमध्ये काम करीत असल्यामुळे खराळवाडी येथील प्राथमिक उपचार केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे.
खराळवाडी येथील बालभवनलगत सध्या असलेल्या प्राथमिक उपचार केंद्रापूर्वी खराळवाडी येथील कांबळे इमारत येथे होते. तेथे १९८२ मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले होते. केंद्र पहिल्या मजल्यावर असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. जागाही भाड्याची होती. केंद्राची जागा अपुरी पडू लागली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
यामुळे २००३ मध्ये हे प्राथमिक उपचार केंद्र खराळवाडी येथील बालभवनाच्या एका हॉलमध्ये सुरू करण्यात आले. सुरुवातीला या ठिकाणी देखील कर्मचारी व रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. या ठिकाणी स्वच्छतागृह नव्हते. तसेच पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी केंद्रात मोठ्या प्रमाणावर साचत होते. परंतु गेल्या वर्षी केंद्रामध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. याचबरोबर पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून पत्रे बसविण्यात आले आहेत.
सध्या या केंद्रामध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ स्टाफ नर्स, २ एनएम, १ वार्डबॉय, १ सफाई कामगार, १ क्लार्क, १ फार्मासिस्ट असे एकूण ८ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी १ क्लार्क ३ दिवस या केंद्रात काम करतात. पुढील ३ दिवस नेहरुनगर येथील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये काम करतात. १ एनएम हे देखील ३ दिवस खराळवाडी केंद्रामध्ये तर ३ दिवस अपघात दवाखाना या ठिकाणी कामासाठी जातात. यामुळे गर्दीच्या वेळी या केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांशी संख्या अपुरी पडते. यामुळे याचा त्रास येथील इतर कर्मचाऱ्यांना व रुग्णांना सहन करावा लागतो. या दोन्ही कर्मचाऱ्यांची एकाच केंद्रावर नियुक्ती असायला हवी, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
केंद्रामध्ये खराळवाडी गांधीनगर, कामगारनगर, एचए वसाहत परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात. दररोज ५० ते ६० रुग्णांची या ठिकाणी तपासणी केली जाते. हे केंद्र ७ खोल्यांचे असून यामध्ये औषध विभाग, वैद्यकीय तपासणी, केस पेपर, इंजेक्शन, कुटुंब नियोजन, संगणक व लिपिक असे विभाग आहेत. केंद्रामध्ये दर गुरुवारी बालकांना लसीकरण केले जाते. गरोदर महिलांची तपासणी, मलेरिया, टीबी याचबरोबर इतर वैद्यकीय तपासणी केली जाते.