कर्मचा-यांची उदासीनता
By admin | Published: October 15, 2014 05:11 AM2014-10-15T05:11:03+5:302014-10-15T05:11:03+5:30
मतदारवाढीसाठी जोमाने प्रयत्न करणा-या जिल्हा प्रशासनाला सरकारी कर्मचारी, शिक्षक व पोलिसांच्या टपाली मतदान टक्केवारीची तिशी गाठण्यातही अपयश येणार असल्याचे चित्र आहे
पुणे : मतदारवाढीसाठी जोमाने प्रयत्न करणा-या जिल्हा प्रशासनाला सरकारी कर्मचारी, शिक्षक व पोलिसांच्या टपाली मतदान टक्केवारीची तिशी गाठण्यातही अपयश येणार असल्याचे चित्र आहे. टपाली मतदानासाठी पात्र असलेल्या ४६ हजार २२२ मतदारांपैकी केवळ २४ हजार २११ मतदारांनी मतदान अर्ज भरून दिला असून, सोमवारपर्यंत (दि.१३) केवळ ४३० मतदारांनी टपाली मतदान केले होते.
निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या सरकारी कर्मचारी, शिक्षक व पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची सोय करून देण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या पहिल्या प्रशिक्षणादिवशी फॉर्म १२ चे वाटप करण्यात येते. यात मतदाराची संपूर्ण माहिती, पत्ता व मतदारसंघ नमूद करावा लागतो. त्यानंतर दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी हा अर्ज जमा करून घेतला जातो. त्यानुसार संबंधितांना मतपत्रिका (पोस्टल बॅलट) पाठविण्यात येते. जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील १० हजार ६०० जवानांना टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज पाठविले होते. मतदानाच्या कामातील ४६ हजार २२२ कर्मचाऱ्यांना मतदानाचा फॉर्म देण्यात आला होता. त्यातील २४ हजार २२२ कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून दिले. त्यानुसार सैनिक व कर्मचाऱ्यांना २९ हजार ८४८ मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील केवळ ४३० जणांचे टपाली मतदान प्राप्त झाले आहे. यातून सरकारी कर्मचाऱ्यांची मतदान करण्याची उदासीनता दिसून येत आहे.
सैनिक, शिक्षक, पोलीस आणि महसूल विभागांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मतदारसंघनिहाय माहिती गोळा केली होती. त्यानुसार शिक्षक, महसूल कर्मचारी व १५ हजार पोलिसांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)