कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस
By भाग्यश्री गिलडा | Published: November 9, 2023 03:48 PM2023-11-09T15:48:28+5:302023-11-09T15:49:46+5:30
पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३ टक्के आणि बक्षिस २१ हजार दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस देण्यात आला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपी) कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. त्यामुळे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिका संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपी कडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकाना देण्यात आले होते. पालकमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालत प्रशासनाला बोनस देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला आहे. याबाबत पीएमटी कामगार इंटक संघटनेने देखील याबाबत पाठपुरावा केला होता. कामगार संघटनेच्या वतीने याबाबत पालकमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कर्मचाऱ्यांनी मानले आभार
पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी दिपक मानकर यांचे आभार मानले आहे.