महात्मा गांधी रोजगार हमीतून वर्षभरात ११ हजार लोकांना रोजगार
By admin | Published: April 12, 2016 04:21 AM2016-04-12T04:21:00+5:302016-04-12T04:21:00+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१५ -१६ या वर्षात ८ कोटी ३९ लाख १० हजारांची कामे झाली असून ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला
पुणे : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१५ -१६ या वर्षात ८ कोटी ३९ लाख १० हजारांची कामे झाली असून ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ हजार ३६५ लोकांनी काम मागितले होते. सध्या १ हजार १३७ लोकांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे.
१ हजार ४०७ ग्रामपंचायतींपैकी ९५४ ग्रामपंचायतींनी काहीही कामे केलेली नाहीत़ दुुष्काळ निवारण आणि हाताला काम मिळावे, या मूळ उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. योजनेच्या १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील कामांची माहिती घेतली असता हे चित्र स्पष्ट झाले आहे़
जो कोणी काम मागेल त्याला वर्षभरात किमान १०० दिवस काम देण्याची अट घालण्यात आली आहे़ जिल्ह्यात १४४ गावांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. आता ८७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे़ त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांना रोजगार पुरविण्याचे संकट आहे़ या पार्श्वभूमीवर मनरेगाचा आढावा घेतला असता, नागरीकरण वाढत असलेल्या हवेली, मावळ, मुळशी या तालुक्यातून अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे या योजनेतून गेल्या वर्षी फक्त १८१ रुपये मजुरी मिळत होती. नागरीकरण वाढत असलेल्या तालुक्यात यापेक्षा जास्त मजुरी मिळत असल्याने या योजनेकडे लोकांचे दुर्लक्ष होत आहे.
या योजनेंतर्गत गेल्या वर्षात ७ हजार ६५ कुटंबांनी रोजगार मागितला. यापैकी ६ हजार ४५४ कुटंबांना रोजगार देण्यात आला, तर १२ हजार ३६४ लोकांनी मागणी केली, त्यापैकी ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.
योजनेतून केली जाणारी कामे
रोपवाटिका, शौचालय बांधकाम, नवीन विहिरी, शेततळे, रस्ता, वनराई बंधारा, वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, फळबाग लागवड, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, गारगोटे, कुक्कुटपालन शेड, गांडूळखत आदी
सध्या १ हजार १३७
लोकांना काम
गेल्या आठवड्यातील चालू कामांचा आढावा घेतला असता आंबेगावमध्ये १३५ (२२), बारामतीत १५३ (१२), भोरमध्ये ४७ (१४), दौंडमध्ये २५८ (३०), हवेलीत (६२) ६, जुन्नर २९१ (३५), खेडला ६० (७), मुळशी ११ (१), पुरंदर ८५ (१७), शिरूर ३५ (१६) अशा १ हजार १३७ लोकांना सध्या रोजगार उपलब्ध झाला आहे. १६० कामे सुरू आहेत.
मजुरी जास्त मिळत नसल्याने या योजनेकडे लोक दुर्लक्ष करतात, तरी लोकांनी याचा लाभ घ्यावा. ग्रामपंचायतीशी संपर्क साधून ग्रामसेवकाकडून जॉबकार्ड काढून घ्यावे. मागेल त्याला रोजगार दिला जाईल.
- नितीन माने, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी, ग्रामपंचायत