रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत!
By admin | Published: January 11, 2016 01:11 AM2016-01-11T01:11:10+5:302016-01-11T01:11:10+5:30
शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीचा भाव ठेवून या संस्थेने आजवर कार्य केले.
पिंपरी : शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीचा भाव ठेवून या संस्थेने आजवर कार्य केले. शिक्षण संस्थांनी ज्ञानदानाचे व्रत कायम ठेवून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता रोजगारक्षम बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी आकुर्डी येथे रविवारी केले.
आकुर्डी-प्राधिकरण येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील,अमर साबळे, ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, एआरसीटीचे चेअरमन डॉ. ए. डी. देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजी खासदार नानासाहेब नवले, ट्रस्टचे सचिव विठ्ठल काळभोर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खजिनदार शांताराम गराडे, पद्मा भोसले, भाईजान काझी, माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, ‘‘आपल्या देशात उच्च शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकीकरण झाले आहे. पण गुणात्मक दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी पदवीधर होतो, पण तो रोजगारक्षम नसतो. देशात सध्या बेरोजगारी ही समस्या राहिलेली नसून रोजगारक्षम तरुण मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये सध्याच्या तरुण पिढीकडे नसल्याची खंत उद्योगसमूहाकडून केली जाते.’’
राज्यपाल म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश झाला आहे. सर्वाधिक वेगाने वाढणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आॅटो, फार्मास्युटिकल्स, मॅकेनिकल, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची ओळख आशिया खंडात आहे. उद्योगक्षेत्राचा विकास साधायचा असेल, तर उद्योगांना कुशल कामगार अधिक उपलब्ध होण्याची गरज आहे.’’
शिक्षण क्षेत्राविषयी राज्यपाल म्हणाले, ‘‘शिक्षण संस्थांनी उद्योगांच्या सहकार्याने त्यांना कोणती कौशल्ये असणारे विद्यार्थी हवे आहेत, याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निश्चित करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीस लागेल आणि उद्योगसमूहांनाही त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळेल. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांनी उद्योजकता आणि नावीन्याचा ध्यास घेण्याची वृत्ती जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नोकऱ्या मागणारे पदवीधर संस्थेतून बाहेर पडण्याऐवजी नोकऱ्या देणारे उद्योजक घडविण्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा.’’
‘‘शिस्तबद्धपणे शिक्षण देणारी ही संस्था आहे. भाऊंनी सहकार, राजकारण, समाजकारणाचे धडे दिले. त्यांच्या योगदानातूनच ही संस्था उभी राहिली आहे,’’असे आढळराव पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण ही संस्था देत चांगले व गुणवत्तात्मक शिक्षण देत आहे. भविष्यात अभिमत विद्यापीठासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.’’ रौप्यमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन झाले. अध्यक्ष लांडगे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. भाईजान काझी यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)