निवडणूक बनलीय अनेकांसाठी रोजगाराचे साधन
By admin | Published: January 8, 2017 03:35 AM2017-01-08T03:35:47+5:302017-01-08T03:35:47+5:30
महापालिका निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि अद्याप एकाही पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली नसल्याने इच्छुकांना प्रचार करण्यासाठी पगारी कार्यकर्ते ठेवण्याची वेळ
पुणे : महापालिका निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि अद्याप एकाही पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली नसल्याने इच्छुकांना प्रचार करण्यासाठी पगारी कार्यकर्ते ठेवण्याची वेळ आली आहे.
महापालिका निवडणुकीत अगदी घरा-घरापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या
मदतीने किमान आपले नाव तरी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाचे कार्यकर्ते
यासाठी मिळणे अवघड झाल्याने अनेकांनी पगारी कार्यकर्ते नेमले आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रके वाटत आहेत.
यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभागाचा विस्तार वाढला आहे. त्यातच आपल्यासोबत पक्षाकडून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत माहिती नाही. तरीही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणाही तितकीच सक्षम असणे
आवश्यक आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबविली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल, यानुसार नियोजन केले जात आहे.
प्रभागात विविध कार्यक्रम राबविण्यासह मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे.
यंदा प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासह ‘हायटेक’ प्रचारालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. ‘गुड मॉर्निंग’पासून ते विविध सुविचार, संदेश या माध्यमातून प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचे टाकण्यात येणारे फोटो, त्याचे डिझाईन डिझायनरकडून करून घेतले जात आहे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र माणसे नेमण्यात आली आहेत. त्यामुळे यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
यासह परिचयपत्रके छापण्यात आली असून, ही पत्रके घरोघरी पोहोचविली जात आहेत. काही ठिकाणी इच्छुक स्वत: घरोघरी जात आहेत, तर काही जणांनी या कामासाठी रोजंदारीवर माणसे
नेमली आहेत. तीनशे ते चारशे रुपये देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेतले जात आहे. प्रचारासाठी चारचाकी वाहनांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे इच्छुकांनी भाडेतत्त्वावर वाहने घेतली आहेत. महिनाभर प्रचारात मोठ्या प्रमाणात वाहनांचा उपयोग केला जात आहे. वाहनमालकाला रोजचे भाडे देण्यासह चालकालाही रोजगार मिळत आहे. (प्रतिनिधी)
फ्लेक्स उभारणीसाठी जादा खर्च
प्रचाराचा सर्वांत जास्त भर फ्लेक्सउभारणीवर असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुकाने प्रभागात फ्लेक्सउभारणीचा धडाका लावला आहे. दरम्यान, हे फ्लेक्सउभारणीचे काम करणाऱ्यांनादेखील रोजगार उपलब्ध झाला आहे. यासह मतदारयादी तयार करणे, स्लिप तयार करणे, विभागनिहाय माहिती ठेवणे या कामासाठीही माणसे नेमण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवसांत अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांकडून यंदा ‘हायटेक’ यंत्रणेचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे.
मतदारयादीचा तपशील ठेवण्यापासून ते प्रचाराचे नियोजनदेखील लॅपटॉपच्या माध्यमातून केले जात आहे. विशिष्ट माहिती मिळविणे, मतदारांचे नाव, संपर्क क्रमांक संकलित करणे आदी कामे लॅपटॉपद्वारे केली जात असून, ही यंत्रणा राबविण्यासाठी काही
जणांनी संगणक अभियंत्यांचीही मदत घेतली आहे. प्रचाराची सर्व यंत्रणा हाताळता यावी, यासाठी इच्छुकांनी प्रभागात कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयामध्येही किमान दोन ते तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.