औषधी वनस्पतींच्या संवर्धनातून रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:50+5:302021-09-02T04:20:50+5:30
तुळशी, अश्वगंधा, हिरडा आदी वनस्पतींचा वारंवार वापर केल्याने निसर्गातील औषधी वनस्पती जवळजवळ संपत आल्या आहेत. भारतात अजूनही या ...
तुळशी, अश्वगंधा, हिरडा आदी वनस्पतींचा वारंवार वापर केल्याने निसर्गातील औषधी वनस्पती जवळजवळ संपत आल्या आहेत. भारतात अजूनही या वनस्पतींच्या लागवडीकडे दुर्लक्ष आहे. फुकट मिळणाऱ्या वनस्पती स्वीकारण्यावर भर दिला गेला. त्यातील खऱ्या-खोट्या गोष्टींचा विचार केला जात नाही. पूर्वी औषधी वनस्पतींची माहिती असणारे अनेक लोक होते. त्यांना वैद्य म्हणून संबोधले जात होते. तेसुद्धा दुर्मिळ होण्याचा मार्गावर आहेत.
अलीकडच्या काळात शिक्षण घेऊन आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्यांना या डॉक्टरांनासुध्दा औषधी वनस्पतींची माहिती नाही. त्यांना केवळ अभ्यासक्रमात शिकवण्यात आलेल्या वनस्पतींचीच माहिती आहे. त्याच वनस्पतींचा वापर ते वारंवार करून घेतात. अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांचा जंगलातील वनस्पतींचा अभ्यास कमी आहे.
गेल्या काही वर्षांत शहरे वाढत गेली आणि त्यामुळे सिमेंटची जंगले तयार झाली. तसेच जंगलाला आग लागणे, रस्त्यांचे रुंदीकरण,धरण बांधणे, लोकांनी निसर्गाचा ऱ्हास करून शेती व घरे बांधली, अशा कारणांमुळे नको असणाऱ्या व हव्या असणाऱ्या वनस्पतींची तोड झाली. जंगलाचा ऱ्हास झाल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर वनस्पतींची लागवड करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना एकत्रित करून झाडे लावण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, झाडे लावून ती जगवण्याची प्रवृत्ती अद्याप आपल्यात रुजलेली नाही. ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालय व स्टेड मेडिशल प्लॅन्ट बोर्ड यांनी शेतकरी, स्वयंसेवी संस्था आदींना जास्तीत जास्त निधी देऊन औषधी वनस्पतींची लागवड केली जात आहे. सुमारे ९५ प्रकारची औषधी वनस्पतींची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. त्याच वनस्पतींच्या लागवडीवर अधिकाधिक भर दिला जात आहे. तसेच झाडे लावून जगवण्याचे व त्यातून निर्माण होणाऱ्या कच्च्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. आयुष मंत्रालयाने पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या सहकार्याने पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र निर्माण केले आहे. त्यात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमन यांचा समावेश केला आहे.
परदेशात शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. परदेशात विद्यार्थ्यांना गवताबाबतही माहिती दिले जाते. भारतात हा विचार झाला नाही. आपल्याकडील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी व ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा या वनस्पतींचे संरक्षण करू शकतात. मात्र, अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रातसुध्दा चंगळवादाचा शिरकाव झालेला दिसतो. शाळा-महाविद्यालयाची भव्य इमारत, मोठे खेळाचे मैदान आदी असणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सध्या वाढलेली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून झाडे जगवण्याची अपेक्षा कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होतो, असे असले तरी शासन विविध उपक्रम राबवून झाडे जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.
औषधी वनस्पतींची आवड असणाऱ्यांना रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. झाडे जगवल्यास त्यांना त्याचा मोठा मोबदला मिळत आहे. पूर्वी फॉरेस्ट नर्सरीकडून केले जाणारे काम वेगळ्या पध्दतीने सध्या सुरू आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली पाहिजे. तेव्हाच लोकांना रोजगारही मिळेल आणि औषधी वनस्पतींची संख्यासुध्दा वाढेल. तसेच लोकांना झाडांचे महत्त्वसुध्दा लक्षात येईल. सध्या औषधी वनस्पतींबाबत निबंध व वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना औषधी झाडे लावण्याबाबत अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, जंगलामध्ये झाडे लावली पाहिजेत.
शेतकऱ्यांना रोपे देण्याबरोबरच शाळा महाविद्यालयांना दत्तक घेऊन त्यांना औषधी वनस्पती देता येऊ शकतात. तसेच त्यांच्याकडून या वनस्पतींची लागवड जंगलामध्ये करता येऊ शकते. तसेच त्याच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांना देता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा उपक्रम राबविला असून, भीमाशंकर, मुळशी आदी ठिकाणी वनस्पतींची लागवड केली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. त्यामुळे जंगलांमधील औषधी वनस्पतीसुध्दा वाढतील. शहराजवळील रस्ते दत्तक घेऊन दोन्ही बाजूंना झाडे लावणे गरजेचे आहे. झाडे ही मानवी शरीराची फुप्फुसे आहेत. त्यांच्याकडूनच प्राणवायू मिळतो. त्यामुळे झाडांच्या संवर्धन व संरक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
- डॉ. सुभाष देवकुळ, माजी प्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
(शब्दांकन : राहुल शिंदे)
फोटो - कडुलिंब, कोरफड