विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

By admin | Published: October 10, 2016 02:39 AM2016-10-10T02:39:17+5:302016-10-10T02:39:17+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्विक हिल अ‍ॅकॅडमी इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबरच केपीआयटी टेक्नॉलॉजीबरोबर नुकताच शैक्षणिक करार

Employment-oriented courses at the university | विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

Next

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्विक हिल अ‍ॅकॅडमी इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबरच केपीआयटी टेक्नॉलॉजीबरोबर नुकताच शैक्षणिक करार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एमटेक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि आॅटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत अशा रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, असे विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गेल्या वर्षात जर्मनी, नॉर्वेसारख्या देशातील नामांकित विद्यापीठांबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण शैक्षणिक करार झाले आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी परदेशातील विद्यापीठांबरोबर ५५ हून अधिक करार झाले आहेत. त्याचबरोबर विविध औद्योगिक कंपन्यांनी विद्यापीठाबरोबर करार करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
डॉ. गायकवाड म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टी आॅनलाइन होत आहेत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे त्यात वाढ होणार असल्याने सायबर सिक्युरिटीची अधिक आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने क्विक हिल या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर करार करून सायबर सिक्युरिटीसाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमटेक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी’ असे या नव्या अभ्यासक्रमाचे नाव असेल. त्याचबरोबर पुणे परिसरात अनेक आॅटोमोबाईल कंपन्या असून, गेल्या काही कालावधीपासून चारचाकी वाहनांमध्ये संगणकाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यापीठाने केपीआयटी टेक्नॉलॉजीबरोबर करार करून आॅटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
विद्यापीठातर्फे नेहमीच कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जात असून, त्यात प्रोग्राम इन मेडिशनल केमिस्ट्री, बीएस्सी.बीएड. आदी अभ्यासक्रमांची उदाहरणे देता येतील, असे नमूद करून गायकवाड म्हणाले, की संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सुसज्ज ग्रंथालये उभी केली जात आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने शैक्षणिक कामांसाठी विविध संस्थांकडून सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी मिळविला आहेत. त्यात विद्यापीठाला युनिव्हर्सिटी पोटेन्शियल फॉर एक्सलन्स (यूपीई), डीएसटीकडून अनुक्रमे ५० कोटी व ३१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झालेल्या ३६ कोटी निधीतून १० कोटी रुपये विद्यापीठात संशोधन करणाऱ्या एम.फिल., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जात आहे. केवळ आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाच नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी चार प्रकारच्या शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या असून, अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. विद्यापीठाला नाशिक व अहमदनगर येथे विस्तार वाढविण्यासाठी जमीन प्राप्त झाली असून, येथेही पुढील काळात नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीही योजना राबविल्या.

Web Title: Employment-oriented courses at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.