संगणक अभियंत्याने शेतातून दिला रोजगार
By admin | Published: October 2, 2015 01:02 AM2015-10-02T01:02:08+5:302015-10-02T01:02:08+5:30
संगणक अभियंता म्हणून शहरात ऐट मिरविण्याच्या, नोकरशाहीच्या जंजाळातून बाहेत पडून स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने करीत खेड्यातील एक युवक बघता-बघता उद्योजक बनला
रवी साकोरे, काळूस
संगणक अभियंता म्हणून शहरात ऐट मिरविण्याच्या, नोकरशाहीच्या जंजाळातून बाहेत पडून स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने करीत खेड्यातील एक युवक बघता-बघता उद्योजक बनला. रूपेश आरगडे या तरुणाने प्रयत्नपूर्वक शेतीमध्ये काम सुरू केले व शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून परिसरातील १७० जणांना कायमचा रोजगारही मिळवून दिला आहे.
काळूस (ता. खेड) येथे राहणाऱ्या या युवकाने पारंपरिक शेतीतील मधुमका (स्वीट कॉर्न) पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारला. लहानपणापासूनच शेतीची आवड असलेला रूपेश संगणक अभियंता आहे.
रूपेशचे वडील पारंपरिक शेतीबरोबरच मधुमका विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, या व्यवसायातील व्यापारी मंडळींच्या साखळीमुळे पिकातून म्हणावा तसा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. हे लक्षात आल्यावर याच मालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करता येईल का, असा विचार रूपेशने केला.बाजारपेठेतील उलाढालीची आणि व्यवसायातील तांत्रिक बाबींची बारकाईने माहिती घेतली. राष्ट्रीयीकृत बँकेच्या पिंपळगाव शाखेतून १ कोटी रुपयांचे कर्ज त्याने मिळविले. व्यवसायासाठीची यंत्रसामग्री इंडोनेशिया येथून खरेदी केली. नंतर व्यवसाय सुरू केला. आता या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल ३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. रूपेशने गावातील १२५ महिला व ५० पुरुषांना शाश्वत रोजगार मिळवून दिला आहे. स्थानिक मजुरांबरोबरच भंडारा, गोंदिया येथील मूळचे असणारे काही कामगारही येथे रोजंदारीवर काम करीत आहेत. दिवसभराच्या, कणसातील दाणे सोलून वेगळे काढण्याच्या कामातून मजुरांना २५० ते ३०० रुपये रोजगार मिळतो.