Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 09:54 AM2023-12-11T09:54:15+5:302023-12-11T09:58:01+5:30
‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या
पुणे : अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीचे वस्त्र विणताना रामभक्तांचाही हातभार लागावा, यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि हेरिटेज हँडविविंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पहिले दोन धागे विणून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ रविवार दि १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर पार पडला.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीसाठी वस्त्र विणण्याच्या ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमांतर्गत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पहिले दोन धागे विणले. त्यानंतर उद्घाटन कार्यक्रमासाठी त्या मॉडर्न महाविद्यालयावर आल्या. परंतु, कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे स्मृती इराणी उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता मुंबईला रवाना झाल्या.
यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, उपक्रमाच्या आयोजक अनघा घैसास, विनय पत्राळे, आदी उपस्थित होते.
गोविंद देवगिरी म्हणाले, ‘अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निर्माण होत असताना, ‘टुकडे टुकडे गँग’च्या मनोवृत्तींच्या मंडळींना हिंदू समाजाची जरब निर्माण होणे आवश्यक आहे. कारण जुनी मंदिरे ज्या पद्धतीने नेस्तनाबूत केली, त्याप्रमाणे राममंदिराबाबतही काहीतरी करण्याचे मनसुबे ही मंडळी रचत आहेत.’ ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राममंदिर आंदोलनाची लोकचळवळ उभी राहिली,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. उद्योगपतींकडून नव्हे, तर श्रीरामाच्या सेनेकडून मंदिर उभारले जात असून, त्यामागे राष्ट्राची शक्ती एकवटली आहे,’ असे भय्याजी जोशी म्हणाले. अनघा घैसास यांनी उपक्रमाची माहिती दिली.