‘ईएमआरसी’चा माहितीपट देशात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:52+5:302021-08-19T04:13:52+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) निर्मिलेल्या ‘कमला- द स्वदेसी न्यूट्रीइंडियन’ या माहितीपटाला देशपातळीवर ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) निर्मिलेल्या ‘कमला- द स्वदेसी न्यूट्रीइंडियन’ या माहितीपटाला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘विज्ञान प्रसार’ या संस्थेतर्फे दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी ‘विज्ञान चित्रपट महोत्सव’ ही संकल्पना घेत देशपातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्ली येथे १३ व १४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. रुपये पन्नास हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ईएमआरसी’ केंद्राने महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या कार्यावर माहितीपट तयार केला. डॉ. कमला सोहोनी या विज्ञान विषयात केंब्रीज विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. देशातील लोकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा, या हेतूने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहारशास्त्रातील पोषक अन्नद्रव्यांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन ‘ईएमआरसी’चे संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. सहायक दिग्दर्शक व संकलन मिलिंद पाटील यांचे आहे; आणि संशोधन आणि संहिता अजिता देशमुख यांनी लिहिली आहे.
-----------
“या महितीपटाच्या निमित्ताने डॉ. कमला सोहोनी यांचे भारतासाठीचे योगदान सर्वांसमोर आले आहे. ‘ईएमआरसी’ने केलेले हे काम कौतुकास्पद आहे.”
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------