आधी वैद्यकीय यंत्रणा सक्षम करा,नंतरच रुग्णांना दाखल करून घ्या; महापालिकेची 'लाईफलाईन'ला तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:30 AM2020-09-04T11:30:27+5:302020-09-04T11:31:17+5:30
८०० बेडचे जम्बो हॉस्पिटल उद्घाटनंतर आठ दिवस उलटूनही पूर्णक्षमतेने सुरू होऊ न शकलेले नाही.
पुणे : कोविड-१९ च्या रूग्णांसाठी मोठा गाजा-वाजा करून उभारलेल्या जम्बो हॉस्पिटल व्यवस्थापनाला, आधी हॉस्पिटलमधील सर्व आरोग्य विषयक यंत्रणा सक्षम करा, पुरेसे डॉक्टर व अन्य पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करावा व त्यानंतरच नवीन रूग्णांना दाखल करून घ्यावे,अशी तंबी पुणे महापालिकेने दिली आहे. ८०० बेडचे हे जम्बो हॉस्पिटल आठ दिवस उलटूनही पूर्णक्षमतेने सुरू होऊ न शकल्याने, पुणे महापालिकेने पीएमआरडीएकडे खुलासा मागविला आहे. तसेच पीएमआरडीएकडूनही याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाचे काम असलेल्या ‘लाईफ लाईन’ या एजन्सीला नोटिस पाठविण्यात आली आहे.
जम्बो हॉस्पिटल मध्ये कोविड-१९ च्या रूग्णांसाठी ८०० बेडची व्यवस्था राहणार, रूग्णांना वेळेत व मोफत उपचार मिळणार म्हणून कोट्यावधींचा खर्च प्रशासकीय स्तरावरून करण्यात आला व कोविड रूग्णांसाठी एक आशेचा किरण दाखविला गेला. हे करीत असताना आधीच कमकुवत असलेल्या राज्य शासनाच्या व पुणे महापालिकेच्या यंत्रणेला या जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन व वैद्यकीय मनुष्यबळ पुरविणे शक्य नसल्याने, हे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी पीएमआरडीने निविदा प्रक्रिया राबवून मुंबईमध्ये चार मोठ्या कोविड सेंटर चे काम पाहणाºया ‘लाईफ लाईन’ या एजन्सीला सक्षम एजन्सी म्हणून हे काम दिले. पण ही एजन्सीही या वैद्यकीय सुविधा देण्यामध्ये फोल ठरली असल्याचे खुद्द पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्य केले आहे. त्यामुळे जेवढी क्षमता आहे तेवढेच कोविड-१९ चे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्या अशी तंबीच त्यांनी ‘लाईफ लाईन’ एजन्सीला दिली आहे.
८०० बेडच्या या जम्बो हॉस्पिटलमध्ये ३६० रूग्णांपेक्षा जास्त रूग्णांना आजतरी ‘लाईफ लाईन’ वैद्यकीय सेवा देऊ शकत नसल्याचे वास्तव असल्याचेही विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तर या एजन्सीच्या अपयशामुळे महापालिकाच आता त्यांना काही डॉक्टर पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरूवारी रात्री येथे १६ डॉक्टर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर या एजन्सीच्या बरोबरच ज्या दोन अन्य एजन्सींनी जम्बो हॉस्पिटलकरिता निविदा सादर केल्या होत्या, त्यांच्याशी बोलून येथील कमतरता दूर करण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ घेण्यात येणार आहे. तसेच पिंपरी येथी जम्बो हॉस्पिटलमधील अतिरिक्त पॅरामेडिकल स्टाफ याठिकाणी मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------------------------------