राज्यातील मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:34 PM2020-01-06T18:34:14+5:302020-01-06T18:46:31+5:30
पुण्यातील मेट्रो चे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार
पुणे : राज्यातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर राज्य शासन भर देणार असून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात मेट्रो महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पुणेमेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट या पाच किलोमीटर भुयारी मार्गासाठी चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. महामेट्रोच्या वतीने आयोजित पुणे मेट्रोच्या भुयारी कामासाठीच्या 'मुळा' दुसऱ्या टीबीएम मशिनचे अनावरण व कामाचा शुभारंभ आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार अनिल भोसले, महामेट्रोचे संचालक सुब्रमणियम रामनाथ, अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, पुण्यातील मेट्रो चे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. हे काम कठीण आणि आव्हानात्मक असले तरी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्यामुळे अडचण येणार नाही. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर वेळेची व इंधनाची बचत होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. महामेट्रो ने मेट्रो चे काम गतीने आणि दजेर्दार पध्दतीने करावे. हे काम निर्देशित वेळेत पूर्ण करुन महामेट्रोने नागरिकांना त्याचा आनंद द्यावा.
पुणे शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगद्याचे काम सुरू होत असून एकूण चार टीबीएम द्वारे साधारणपणे दहा किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्यात येत आहे. पुणे मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महा मेट्रोने जागतिक दर्जाच्या अद्ययावत टीबीएम मशीनचे पाचारण केले आहे. हे टीबीएम मशीन जपान इन्फ्रास्ट्रक्चर (जेआयएस) आणि आॅस्ट्रेलियन स्टँडर्ड (एएस) या जागतिक मानांकनानुसार आधारित असून त्याचा व्यास 6.65 मीटर आणि लांबी 120 मीटर आहे. हे अवजड मशीन 210 के डब्ल्यूच्या सहा विजेवर चालणाºया मोटारींद्वारे चालवले जाते.
भुयारी मार्गासाठी टीबीएम मशीन
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा टप्पा भुयारी मार्गाचा आहे. या पाच किलोमीटर भुयारी मागार्साठी चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. यापैकी 'मुळा' या पहिल्या टीबीएम मशीनने 31 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी महाविद्यालय पटांगण येथून बोगद्याचे काम सुरु केले आहे. महामेट्रोकडे 'मुळा' हे दुसरे टीबीएम मशिन दाखल झाले असून या कामाचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.