अतिक्रमणांचा भरलाय बाजार

By admin | Published: January 18, 2017 01:50 AM2017-01-18T01:50:38+5:302017-01-18T01:50:38+5:30

शहराची बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकासह मावळा पुतळा ते भांगरवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा बसला

Enchanted market of encroachment | अतिक्रमणांचा भरलाय बाजार

अतिक्रमणांचा भरलाय बाजार

Next


लोणावळा : शहराची बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकासह मावळा पुतळा ते भांगरवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा बसला असल्याने या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या लोणावळा शहरातील वाहतूककोंडी ही सर्वश्रुत आहे. या वाहतूक कोंडीला वाहनांच्या वाढत्या प्रमाणासोबत शहरातील रस्त्यावर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जबाबदार आहेत. लोणावळा नगर परिषदेने शहरातील ११३ अतिक्रमणांची यादी तयार केली असून, लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. दिवसागणिक शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यातच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील रस्ते वाहतुकीला कमी पडत आहे. त्यातच शहरात लहान-मोठ्या व्यावसायकांची अतिक्रमणे वाढली आहेत.
दुकानांचा माल रस्त्यावर ठेवला जातो. बाजारपेठेत हातगाडी, पथारीवाल्यांनी अतिक्रमणे करत रस्त्याची रुंदी निम्मी केली आहे. फळविक्रेते व भाजी विक्रेते यांनी गाड्या थेट रस्त्यावर लावल्या असल्याने शिवाजी चौकातून चालणे मुश्कील होते.
शिवाजी चौक ते भांगरवाडी दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणांची संख्या जास्त असल्याने या भागातून वाहने चालविताना नागरिकांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शहरात कोठेही वाहनतळाची सुविधा नसल्याने वाहने सर्रास रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. राजकीय वरदहस्त व हितसंबंधामुळे नगर परिषद प्रशासन वा पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चहा वडापावच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काही दिवसांपूर्वी आयआरबीने हटवले. पण मोठे व्यावसायिक, हॉटेल व दुकानदार, धाबे यांची अतिक्रमणे तशीच असल्याने एलआयसी बिल्डिंग ते अंबरवाडी गणपती मंदिर रोड परिसरात हायवेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कायम आहे. (वार्ताहर)
।दुर्लक्ष : वाहतूक पोलिसांनी करावे नियोजन
वाहतूक पोलीस कुमार चौक वगळून शहरात कोठेही वाहतूक नियोजनासाठी दिसत नाही. वर्षभरापूर्वी शिवाजी चौक ते भांगरवाडी इंद्रायणी पूल दरम्यान रस्ता वनवे करण्यात आला होता. तेव्हा काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी झाली होती. मात्र त्यामध्ये सातत्य न राहिल्याने हा वनवेचा प्रयत्न बंद झाल्याने वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. लहान विक्रेत्यांप्रमाणे गवळीवाडा परिसरातील हॉटेल व्यावसायिक व शहरातील मॉलधारकांनी पार्किंगच्या जागांवर अतिक्रमणे करत ती बंद केल्याने वाहने रस्त्यावर उभी राहू लागली आहेत.

Web Title: Enchanted market of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.