जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमच्या जागेत ‘घुसखोरी’?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 02:10 PM2019-12-27T14:10:00+5:302019-12-27T14:16:45+5:30

आयुक्तांकडून गंभीर दखल : अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश..

Enchroachment in the premises of General Arun Kumar Vaidya Stadium? | जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमच्या जागेत ‘घुसखोरी’?

जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमच्या जागेत ‘घुसखोरी’?

Next
ठळक मुद्देपालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याच्या सूचनाअनधिकृत भिंत पालिकेच्याच निधीमधून उभारल्याचा आरोप

पुणे : भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमच्या जागेत बेकायदेशीर संरक्षक भिंत (कंपाऊंड वॉल) घालून पालिकेची जागा एका सोसायटीने बळकावल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असून, पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तसेच क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. हा प्रकार निदर्शनास आणून देताच पालिका आयुक्तांनी एका महिला अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत. 
यासंदर्भात नुकतीच एका शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. भवानी पेठ (प्रभाग क्र. १९) मध्ये पालिकेचे हे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये नागरिकांसाठी व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, खेळ आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. पालिकेने याठिकाणी ओपन जीमही उभारली आहे. या ओपन जीमसह आसपासच्या जवळपास साडेतीन हजार चौरस फूट जागेवर तीन बाजूंनी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत अनधिकृत असून अवघ्या काही दिवसांतच ही भिंत उभी राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतरही स्थानिक अधिकारी आणि क्रीडा विभागाच्या अधिकाºयांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला आहे. 
या अनधिकृत भिंतीमुळे पालिकेच्या मालकीची जागा थेट शेजारच्या खासगी सोसायटीशी जोडली जाणार असून, या सोसायटीमध्ये स्थानिक राजकीय नेत्याचे घर आहे. राजकीय आशीर्वादाने हे अनधिकृत बांधकाम उभे करुन जागा बळकाविण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी याबाबत भवानी पेठ क्षेत्रीय अधिकाºयांकडे तक्रार केली होती. परंतु, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी थेट पालिका आयुक्तांची भेट घेत या विषयाकडे लक्ष वेधले. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आयुक्तांनी तत्काळ अनधिकृत भिंतीवर कारवाईचे आदेश दिले. 
तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याच्या सूचनाही उपायुक्तांना केल्या आहेत.
..............
अनधिकृत भिंत पालिकेच्याच निधीमधून उभारल्याचा आरोप
स्टेडियमच्या जागेत उभारण्यात आलेली अनधिकृत भिंत पालिकेच्याच निधीमधून उभारण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने बांधण्यात आलेल्या भिंतीचा खर्च मात्र शाळेमध्ये केलेल्या कामातच दर्शविण्यात आल्याचा प्रकारही नागरिकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

Web Title: Enchroachment in the premises of General Arun Kumar Vaidya Stadium?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.