इन्काऊंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:12 PM2019-08-14T15:12:48+5:302019-08-14T15:17:57+5:30
पिंपरी चिंचवडचे सहायक पाेलीस आयुक्त राम जाधव यांना तिसऱ्यांदा राष्टपती पदक जाहीर झाले आहे. त्यांना आत्तापर्यंत 750 हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत.
पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पाेलीस आयुक्त व इन्काउंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांना विशेष प्राविण्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. राम जाधव यांना हे तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यांनी आत्तापर्यंत 15 इन्काऊंटर केले असून त्यांना 750 पेक्षा अधिक बक्षिसे मिळाली आहेत. पुणे ग्रामीण पाेलीस दलात असताना त्यांनी अनेक दराेड्याचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
राज्य राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडर हरीचंद्र काळे यांना देखील विशेष प्राविण्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील ९ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.दिलीप बोरास्ते (सहायक आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), राजेंद्र कदम (सहायक पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण), बालाजी रघुनाथ सोनटक्के (पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस ठाणे, चिचंवड), रवींद्र बाबर (सहायक पोलीस निरीक्षक, सीआयडी), किशोर अमृत बाबर (पोलीस उपनिरीक्षक चिंचवड, वाहतूक शाखा), राजेंद्र पोळ (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे), मनोहर चिंतालु (सहायक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, पुणे), अविनाश सुधीर मराठे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा), बाळु मच्छिंद्र राठोड (हेड काँस्टेबल, वडगाव निंबाळकर) अशी त्यांची नावे आहेत.
राम जाधव यांना २००१ मध्ये राष्ट्रपतीचे शौर्यपदक मिळाले आहे. त्यानंतर २००९ मध्ये विशेष गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले असून आता विशेष प्राविण्याबद्दल तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. सहायक पोलीस आयुक्त राम जाधव हे १९८८ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुणे, पुणे ग्रामीण, मुंबई येथे काम केले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड प्रमोद माळवदकर यांच्या इनकाऊंटरमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी आजवर 15 इन्काऊंटर केले आहेत. ग्रामीण पोलीस दलातील देहुरोड पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयात दरोडा प्रतिबंधक पथक हे काम केले आहे़ देहुरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना 7 डिसेंबर 2011 मध्ये रावेत येथे कुख्यात गुंड महाकाली याचा इनकाऊंटर केला होता. त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटमध्ये काम करीत असताना अनेक संशयित दहशवाद्यांना पकडण्यात यश मिळविले आहे.