प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम अन् सायकलींना हवे प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:03+5:302021-06-01T04:09:03+5:30
पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत असून, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीमुळेच अधिक ...
पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत असून, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीमुळेच अधिक प्रदूषण होत असल्याचा अहवाल नुकताच आला आहे. त्यात ९१ टक्के प्रदूषणात वाढ ही याचमुळे झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यावर लक्ष देऊन वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी ‘परिसर’ संस्थेकडून केली आहे. सायकलींना प्रोत्साहन आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करावेत, हे उपायही सांगितले आहेत.
नुकताच ‘आयआयटीएम’च्या सफर संस्थेकडून शहरातील प्रदूषणाबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये वाहतुकीचा वाटा मोठा आहे. वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणात भर पडत आहे. ही वाहतूक कमी कशी करायची, यावर विचार न करता महापालिका मात्र रस्त्यांची रुंदी वाढवणे, उड्डाणपूल तयार करण्यावर भर देत आहे. ते न करता इतर उपाय करावेत, अशा मागणीचे निवेदन परिसरने महापालिका आयुक्तांना दिले आहे. सध्या रस्ता रुंद करणे, पूल तयार करणे हे उपाय कायमस्वरूपीचे नाहीत. उलट त्यामुळे वाहनांच्या संख्येत भर पडून अधिक वाहतूककोंडी आणि प्रदूषणातही भर पडेल, असे परिसरचे विश्वस्त सुजीत पटवर्धन यांनी सांगितले.
——————————-
सायकल मार्ग चांगले करावेत
शहरातील सायकलचालकांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पादचाऱ्यांसाठी सर्व सोयी करायला हव्यात. तरच नागरिक त्याचा अधिक वापर करतील. कोरोनामुळे सायकलकडे अनेकजण वळले आहेत. त्याचा आधार घेऊन शहरात सायकलींचे मार्ग अधिक चांगले करायला हवेत. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून जवळ जायचे असेल, तर त्यांनी सायकलचा वापर करायला हवा, अशी स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.
-------------------
एक लाख लोकसंख्येमागे ५० बस हव्या
सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे देखील गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे नागरिक स्वत:चे वाहन घेऊन जाण्यावर भर देत आहेत. त्यामुळे सर्व सुरळीत झाल्यावर कोंडीचा प्रश्न आणि प्रदूषण वाढणार आहे. म्हणून बसच्या संख्या वाढवायला हव्यात. एक लाख लोकसंख्येमागे ४० ते ५० बस असायला पाहिजेत. सार्वजनिक बसचे मार्ग चांगले करायला हवेत. तरच त्याचा वापर नागरिक अधिक करतील.
------------
पार्किंग योजना लागू करावी
पे अँड पार्क योजनाही राबविणे आवश्यक आहे. तरच नागरिक रस्त्यावर अधिक वाहने घेऊन येणार नाहीत. त्याबाबत २०१७ मध्ये पार्किंग पॉलिसी मंजूर केलेली आहे. ती लगेच लागू केली पाहिजे.
-------------