विकलांग जवानांना मिळाली अनुबोधपटांपासून स्फूर्ती
By admin | Published: July 28, 2014 04:44 AM2014-07-28T04:44:26+5:302014-07-28T04:44:26+5:30
खडकीतील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात (पीआरसी) कारगिल युद्धातील नायकांची स्मृती कारगिल विजय दिनानिमित्त जागविण्यात आली
पुणे : खडकीतील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात (पीआरसी) कारगिल युद्धातील नायकांची स्मृती कारगिल विजय दिनानिमित्त जागविण्यात आली. शनिवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात या जवानांना प्रेरणादायी अनुबोधपट दाखविण्यात आले. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात ५० हून अधिक जवान पूर्णत: किंंवा अंशत: विकलांग अवस्थेत आहेत. कोणत्या तरी कारणाने आपल्या शरीराचा भाग गमाविलेल्या या जवानांना या अनुबोधपटांमुळे आणखी उत्साहाने जगण्याची प्रेरणा मिळाली.
ग्लोबल हिलिंंग फाउंडेशनद्वारा या प्रेरणादायी व्हिडीओपटाचे आयोजन सिनेमा थेरपी या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते. जन्मत: हात, पाय नसलेल्या निक विजिक यांनी प्रभावी वक्ता म्हणून नाव कमावले आहे, तो व्हिडीओपट तसेच मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या कृत्रिम पाय असलेल्या टेरी फॉक्स यांचा अनुबोधपट या वेळी दाखविण्यात आला. पायांच्या साहाय्याने छोेटे विमान चालविणाऱ्या जेसिका फॉक्स, अंध उद्योजक दिव्यांशू गणात्रा यांच्याविषयी माहिती असलेले व्हिडीओपट दाखविण्यात आले.
फाउंडेशनचे संचालक मूर्तजा बुटवाला यांनी आपण आजारी असताना मला याच अनुबोधपटांनी आधार दिला, असे सांगितले.
संयोजक मीता बॅनर्जी यांनी
सांगितले, की पीआरसीमधील जवान खऱ्याखुऱ्या आयुष्यातील हिरो
आहेत. देशाच्या रक्षणासाठी आपली आहुती देणाऱ्या जवानांना
श्रद्धांजली वाहण्यासाठी असेच कार्यक्रम आदर्श आहेत. (प्रतिनिधी)