Mutha Canel:मुठा कालव्याच्या शंभर हेक्टरवर अतिक्रमण : जलसंपदा विभागाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:21 PM2018-10-09T14:21:46+5:302018-10-09T14:30:25+5:30
मुठा उजवा कालवा पर्वती पायथ्याजवळ फुटून आलेल्या कृत्रिम पुरामुळे दांडेकर पूल परिसरात हाहाकार उडाला होता. ही घटना २७ सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती.
विशाल शिर्के
पुणे: मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत मुठा डावा-उजवा कालव्यावर सुमारे शंभर हेक्टर (तीनशे एकर) जमिनीवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती संपर्क कार्यालयापासून ते झोपडी, मंदिरे, व्यायामशाळा अशा विविध प्रकारच्या अतिक्रमणांचा समावेश आहे. ही अतिक्रमणे आठ दिवसांत हटवावीत अन्यथा ती जमिनदोस्त करण्यात येतील अशी नोटीस जलसंपदा विभागाने संबंधितांना बजावली आहे.
मुठा उजवा कालवा पर्वती पायथ्याजवळ फुटून आलेल्या कृत्रिम पुरामुळे दांडेकर पूल परिसरात हाहाकार उडाला होता. ही घटना २७ सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती. यात सर्व्हे नंबर १३२, १३३, १३० आणि २१४ या भागातील आंबिल ओढ्याच्या तीरावर वसलेल्या झोपड्यांची मोठी हानी झाली आहे. या ठिकाणी दीड हजार झोपड्या असून त्यापैकी ६०० झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाल्या आहेत. तर ८० ते ९० झोपड्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत. तसेच दांडेकर पूल भागातील कासम प्लॉट परिसरातील ६० ते ७० झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले.
खडकवासला धरणापासून महानगरपालिका हद्दी पर्यंत तब्बल ३४ किलोमीटरचा कालवा जातो. या शहरीभागात कालव्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. पर्वती येथील दुर्घटना बेकायदेशीररित्या टाकण्यात अलेल्या भूमिगत केबल लाईनमुळे झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. तर, अशा अतिक्रमणांविरोधात काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात जनहीत याचिका देखील दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातून गेलेल्या कालव्यालगत झालेल्या अतिक्रमणांची पाहणी जलसंपदा विभागाकडून नुकतीच करण्यात आली.
कालव्याच्या मध्यमासून अंदाजे शंभर फूट अंतरावर दोन्हीबाजुला बांधकाम अथवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येत नाही. शहर हद्दीतून जाणाºया कालव्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. जलसंपदा विभागाने केलेल्या पाहणीत कालव्यालगतच्या जमिनीवर सुमारे शंभर हेक्टरवर अतिक्रमण झाले आहे. खडकवासला ते शहर हद्दीलगतच्या कालवा भागात पर्वती आणि हडपसर येथे सर्वाधिक अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी राजकीय व्यक्तींनी तर संपर्क कार्यालये थाटली आहेत. या शिवाय झोपड्या, मंदिर, व्यायामशाळा अशा प्रकारची देखील अतिक्रमणे आहेत.