महाशिवरात्रीपूर्वी भीमाशंकरमधील हटवणार अतिक्रमणे; प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:18 PM2018-01-25T12:18:17+5:302018-01-25T12:25:29+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
घोडेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; तसेच मंचर व भीमाशंकर व राजगुरुनगर-भीमाशंकर या रस्त्यावरील देखील अतिक्रमणे काढावीत. यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात. दि. ५ फेब्रवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
घोडेगाव येथे पंचायत समिती हुतात्मा बाबू गेणू सभागृहात भीमाशंकर महाशिवरात्र यात्रेची नियोजन बैठकीत झाली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, कार्यकारी विश्वस्त सुनील जोशी, उपकार्यकारी विश्वस्त अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्तात्रय कौदरे, रवींद्र शिर्के, अॅड. विकास ढगे, अण्णा गोरडे, सुनील देशमुख, प्रशांत काळे, पंचायत समिती सभापती उषा कानडे, उपसभापती नंदा सोनावले, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपअभियंता एल. टी. डाके, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आदी उपस्थित होते.
या वेळी बैठकीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी अनेक धडाकेबाज सूचना दिल्या. महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांची नावे निश्चित करून त्या सर्वांना नोटिसा बजवाव्यात. नोटीस देऊनही अतिक्रमण काढले नाही, तर दि. ५ व १० फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा; तसेच अतिक्रमण काढूनही पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. अतिक्रमण काढताना मी स्वत: हजर राहिल, असे त्यांनी सांगितले.