पुणे: तुळशीबागेतील सुमारे २५० स्टॉल्सवर अतिक्रमण विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:51 PM2022-05-20T14:51:21+5:302022-05-20T15:51:56+5:30
अटी, शर्तींचा भंग करणाऱ्या फेरीवाला व्यावसायिकांचे स्टॉल गुरुवारी बंद करण्यात आले...
पुणे : गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे तुळशीबागेतील सुमारे २५० स्टॉलवर कारवाई करण्यात आली. येथील फेरीवाले व्यावसायिकांनी एप्रिल २०१८ पासून परवाना शुल्क भरलेले नव्हते. व्यावसायिकांकडून सुमारे ३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अटी, शर्तींचा भंग करणाऱ्या फेरीवाला व्यावसायिकांचे स्टॉल गुरुवारी बंद करण्यात आले. त्यामुळे २२१ व्यावसायिकांपैैकी अंदाजे ९५ जणांकडून परवाना शुल्क थकबाकी वसूल करण्यात आली आहे. यापुढेही दैैनंदिन कारवाई केली जाणार आहे. डीपी रस्त्यावरील कारवाईनंतर अतिक्रमण विभागाची कारवाई संथ झाल्याचे दिसत होते.
दहा-बारा दिवसांनी कारवाईला पुन्हा वेग आल्याचे दिसत आहे. रस्ता आणि पदपथांवर अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर तसेच पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये स्वत: व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य झालेला व्यवसाय न करणे, गॅस सिलिंडर, स्टोव्हचा वापर करणे आदी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
तुळशीबागेसह अतिक्रमण विभागाने आणि बांधकाम विभागाने शिवाजीनगर-घोले रस्ता, धनकवडी-सहकारनगर, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. त्यात कात्रज-कोंढवा रस्ता, बहिरटवाडी, भारती विद्यापीठ परिसर आदी ठिकाणांहून अंदाजे ६ ट्रक माल, १ स्टॉल, ७ काऊंटर आणि ४ शेड इत्यादींवर कारवाईचा बडगा उगारला. कात्रज-कोंढवा रोड येथील अंदाजे ३ लाख चौैरस फूट अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
प्रत्येक व्यावसायिकाची थोडीफार थकबाकी शिल्लक आहे. अतिक्रमण विभागाने पूर्वसूचना दिली होती. स्टॉल्सचे नुकसान झाले नाही. अनेक व्यावसायिकांनी लगेचच थकबाकी शुल्क भरले. इतर व्यावसायिक पुढील तीन-चार दिवसांमध्ये शुल्क भरणा करणार आहेत.
- विनायक कदम, उपाध्यक्ष, छोटे व्यावसायिक असोसिएशन