वनजमिनीवरील अतिक्रमण काढले; सतरा एकर जमीन मोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:41 AM2018-10-28T00:41:46+5:302018-10-28T00:42:25+5:30
वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम वन विभागाने राबविली.
बिजवडी : येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम वन विभागाने राबविली. सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याबरोबर इंदापूर व बारामती तालुक्यांतील वनपरिमंडल अधिकारी, वनरक्षक व वनमजूर तसेच राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी व जेसीबी यंत्राच्या साह्याने अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील उभी पिके जमीनदोस्त करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या कारवाईत सुमारे १७ एकर वनजमीन मोकळी करण्यात आली. वर्षभरापासून तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत तालुक्याच्या दहा गावांतील अतिक्रमित वनक्षेत्र रिकामे करण्यात आले असून, यापुढील काळात मोठी कारवाई करण्यात येईल, असे सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांनी सांगितले.
उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वनजमिनीचे सर्वेक्षण करून सीमांकन व हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील दोनशे एकरांहून अधिक जमिनीची हद्द निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वनजमिनीत विविध कारणांसाठी केलेली अतिक्रमणे स्वत:हून काढावीत, असे आवाहन इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले.
या कारवाईमध्ये द्राक्ष, पपईच्या बागा, मका पिकासारखी पिके जमीनदोस्त करण्यात आली. याचबरोबर, या कारवाईचा फटका कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या मळी टाकण्याच्या ठिकाणालाही बसला. मळी टाकण्यासाठी कारखान्याकडून वापरण्यात येत असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात प्रवेश होऊ नये, अशी चारी खोदून वहिवाट बंद करण्यात आली. पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचे दिसून येत होते.
शेतजमिनीच्या अतिक्रमणा बरोबरच वनविभागाच्या अधिकाºयांनी तालुक्यातील उद्योगधंद्यांचेदेखील वनविभागातील अतिक्रमण तातडीने काढावे. जर वनविभाग शेतकरी आणि उद्योजकयांच्यात दुजाभाव करत असेल तर आम्ही शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
- नीलेश देवकर
जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना