शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढले
By Admin | Published: December 26, 2014 04:55 AM2014-12-26T04:55:55+5:302014-12-26T04:55:55+5:30
तालुक्यातील काही शासकीय जमिनींवर अतिक्रमण वाढत चालले आहे. काही ठिकाणी शासकीय जमीन लाटण्याचा सर्रासपणे प्रयत्न सुरू आहे.
मनोहर बोडखे, दौंड
तालुक्यातील काही शासकीय जमिनींवर अतिक्रमण वाढत चालले आहे. काही ठिकाणी शासकीय जमीन लाटण्याचा सर्रासपणे प्रयत्न सुरू आहे. वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण वाढलेले आहे. मात्र, या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
नदीकाठी वनखात्याची मोठ्या प्रमाणावर जागा आहे. तेव्हा भीमा नदी आणि मुळामुठा नदी पात्रातून बेकायदेशी वाळू उपसा करण्यासाठी परप्रांतातून मजूर आणले जातात. या मजुरांनी नदीकाठच्या शासकीय जागेत तसेच वनखात्याच्या जागेत अतिक्रमण करुन वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबरीने पुर्नवसनाच्या काही जागा लाटण्याचा प्रयत्न सुरु असून याकामी शासनाची धुळफेक केली जात आहे.
मृत माणसांच्या जागी त्यांच्या नावावर जिवंत माणस उभी करुन खोटे खरेदीखत करण्याचे प्रकार यापूर्वी झालेले आहेत. तेव्हा शासनाने शासकीय जागांवर अतिक्रमण केलेल्या लोकांचा शोध घेऊन शासनाच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात. विशेषत: दौंडच्या ग्रामीण भागात नदीकाठी असलेल्या गायरान जागेचाही दुरुपयोग करुन या जागाही बळकविण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला आहे. तर काही वीटभट्टी चालकांनी देखील शासकीय जागा बळकवलेल्या आहेत. हा सर्व प्रकार होत असताना शासकीय अधिकारी गप्प का आहेत याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. ग्रामीण भागाबरोबरीने दौंड शहरातही काही शासकीय जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे.