निमसाखर येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:05 AM2018-10-01T00:05:03+5:302018-10-01T00:05:49+5:30
निमसाखर हे पाच मोठ्या वाड्यावस्त्यांचे मिळून साडेपाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावामध्ये सरकारी जागेवर यापूर्वी जुनी अतिक्रमणे आहेत व सध्याही मिळेल
निमसाखर : निमसाखर व परिसरात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गायरान व गावठाणासह अन्य शासकीय जागेवर चार ते पाच हेक्टरपर्यंत अतिक्रमणे आहेत. आर्थिकदृष्ट्या गरजूंची अतिक्रमणे नियमित करून सधन व प्रभावशाली मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
निमसाखर हे पाच मोठ्या वाड्यावस्त्यांचे मिळून साडेपाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावामध्ये सरकारी जागेवर यापूर्वी जुनी अतिक्रमणे आहेत व सध्याही मिळेल तिथे अतिक्रमणे बिनधास्तपणे करीत आहेत. स्थानिकांनी अनेक ठिकाणी जागा बळकावल्या आहेत. काही राजकारण्यांनी शासकीय जमिनी बळकावल्या असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. यात बऱ्याच संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक, गरीब कुटुंबीयांचीसुद्धा घरे शासकीय जागेत असल्याची माहिती पुढे येत आहे. गावठाण भागातही अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.
या पूर्वी अतिक्रमणे काढली गेली नसली तरी मात्र गरजू वषांनुवर्षे राहत असलेल्या कुटुंबांची घरे नियमित करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
यामुळे ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी किंवा अतिक्रमणे नियमित करावे, यामुळे कररूपाने ग्रामपंचायत महसुलातही मोठी वाढ होईल आणि याचा फायदा ग्रामपंचायतीलाच होईल अशीही चर्चा होत आहे.
मध्यंतरी शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकºयांच्या जमिनी वाटप झाल्यानंतरही निमसाखर हद्दीत अनेक ठिकाणी मंडळाच्या उरलेल्या शेतजमिनीवर काही प्रमाणात अतिक्रमणे पाहावयास मिळत असल्याचे नागरिकांमधून चर्चा आहे. मात्र सध्या मोजणी विभागाकडून मोजणीचे काम रखडले आहे. संबंधित विभागाकडून हे काम लवकर मार्गी लावले जाऊन अतिक्रमणे किती आहेत, हे स्पष्ट होऊन नंतर कारवाई होईल. याचबरोबर निमसाखर भागात सार्वजनिक वनीकरण विभागाचे ३१.३० क्षेत्र असून पूर्वी मोठ्या प्रमाणावर या भागात वृक्षलागवड केली गेली होती. मात्र, नंतरच्या काळात दुर्लक्ष झाले आणि सध्या झाडे कमी पण काटेरी झुडपेच जास्त अशी अवस्था आहे. या ठिकाणी स्थानिक राजकारणाशी संलग्न असलेले गुंड प्रवृत्तीचे वाळूमाफिया यांनी अतिक्रमण करुन या ठिकाणी रस्ते आणि वाळूसाठे केले आहेत. काही सधन शेतकºयांनीसुध्दा वनीकरणाची जागा शेतीसाठी गिळंकृत केल्याची परिसरात चर्चा आहे.
निमसाखर गाव परिसरात शेती महामंडळाची ५५.९३ हेक्टर, सामाजिक वनीकरण विभागाची ३१.३० हेक्टर, गायरानासाठी ३१.६८ हेक्टर तर गावठाण क्षेत्र ४.०५ हेक्टर अशी चारही विभागाची सरकारी १२२ हेक्टर क्षेत्र आहे. गायरान भागासह गावठाण भागातही अतिक्रमणे आहेत.