महामार्गावर अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Published: April 25, 2017 03:54 AM2017-04-25T03:54:49+5:302017-04-25T03:54:49+5:30
पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडीला अडसर ठरणारी अतिक्रमणे नेमकी कोणी काढायची, याबद्दल सर्वच सावध भूमिका घेत आहेत.
शिक्रापूर : पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडीला अडसर ठरणारी अतिक्रमणे नेमकी कोणी काढायची, याबद्दल सर्वच सावध भूमिका घेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस कार्यवाही करून रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढण्याची मागणी वाहतूककोंडीला दररोज सामोरे जाणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक व पाबळ चौक या ठिकाणी वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी येथील सर्व अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी हटविण्यात आली होती. त्यानंतर येथील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी झाली.
परंतु, अलीकडील काळात पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूर, कोरेगाव भीमा, सणसवाडी, रांजणगाव अशा अनेक ठिकाणी अतिक्रमणे उभी राहत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. या भागात एक अतिक्रमण झाल्यानंतर शेजारीदेखील राजरोसपणे अतिक्रमण उभे राहते. त्यामुळे येथे अतिक्रमण करणाऱ्यांना कसलेही भय राहिले नसल्याचे दिसते. तर, येथील रस्त्याच्या कडेला अतिक्रमण झाल्यामुळे येथे उभ्या राहणाऱ्या वाहनांना भररस्त्यात उभे राहावे लागत असून, त्यामुळे नागरिकांनादेखील पूर्ण रस्त्यावर उभे राहावे लागते. (वार्ताहर)