हांडेवाडी रोडवर पत्राशेडची अतिक्रमणे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:07+5:302021-01-25T04:13:07+5:30

हडपसर : शहराची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे होत आहे. तर दुसरीकडे अनधिकृत टप-या, पत्राशेड यामुळे काही परिसरांमध्ये बकालपणा वाढत ...

Encroachment of letter shed on Handewadi Road increased | हांडेवाडी रोडवर पत्राशेडची अतिक्रमणे वाढली

हांडेवाडी रोडवर पत्राशेडची अतिक्रमणे वाढली

googlenewsNext

हडपसर : शहराची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे होत आहे. तर दुसरीकडे अनधिकृत टप-या, पत्राशेड यामुळे काही परिसरांमध्ये बकालपणा वाढत आहे. विशेषतः हडपसर-हांडेवाडी रोड व श्रीराम चौक परिसरामध्ये या अनधिकृत टप-या आणि पत्राशेड तसेच भंगार दुकानांची संख्या जास्त आहे. बेकायदेशीर अतिक्रमण वाढत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे गुंडगिरीचे प्रमाण आणि हफ्तेखोरीचे प्रमाण वाढले आहे.

हडपसर-हांडेवाडी रोड तसेच ससाणेनगर-सय्यदनगर आणि महंमदवाडी रोडवर सार्वजनिक मोकळ्या तसेच काही ठिकाणी खासगी जागेत अनाधिकृतपणे पत्राशेड उभारली आहेत. एखाद्या ठिकाणी व्यावसायिकाने अनधिकृत अतिक्रमण केले, की याची संख्या वाढत जाते. पुढे कारवाई होत नसल्याचे दिसून आले की त्यात अतिक्रमनात अधिकच भर पडली जाते. तेव्हा कारवाई करताना अनेक वाद वाढले जातात. एखादे अतिक्रमण होत असतानाच अनेक नागरिक त्याबाबत पालिकेला कल्पना देतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि पुढे ही परिस्थिती निर्माण होते. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यात हडपसर-हांडेवाडी रोडवर हांडेवाडी रोडवरील अशोकनगर, कोहिनूर आणि रुणवाल सिगल सोसायटीच्या परिसरात काही ठिकाणी मोकळ्या तर काही ठिकाणी खासगी जागेत बिनधास्तपणे अनधिकृत पत्राशेडची दुकाने थाटून परिसर बकाल केला आहे. येथे श्रीराम चौकात एकीकडे सुशोभीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे, तर त्याच चौकाच्या परिसरातील रस्त्यांच्या कडेला अनाधिकृतपणे पत्राशेड उभारली आहेत. मात्र कारवाई न केल्याने हडपसराचा दिवसेंदिवस बकालपणा वाढत आहे.

चौकट

अतिक्रमण आणि बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव

हडपसर-हांडेवाडी रोडवर वाढलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी यासाठी विविध संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली, त्यावेळी केवळ अतिक्रमणाचा फार्स केला. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत. येथील अतिक्रमण विषयी अतिक्रमण विभागातील अधिकारी बांधकाम विभागाकडे तर बांधकाम विभाग अतिक्रमण विभागाकडे बोट दाखवून कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे, असे येथील सोसायटी धारकांचे म्हणणे असून प्रशासनाच्या कारभाराविषयी साशंकता निर्माण होत आहे.

चौकट

अनधिकृत पत्राशेडमध्ये चायनिज व मद्यपान?

या परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पत्राशेड उभारून ती भाड्याने देण्यात येतात. येथे चायनिज सेंटर चालू करण्यात आली असून रात्री येथे मद्यपान करून गोंधळ होण्याच्या घटना घडत आहेत. यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी येथे नियमित कारवाई करण्याची मागणी परिसरातील सोसायटीधारकांनी केली आहे.

फोटो ओळी : हांडेवाडी रोडवर श्रीराम चौक, रुणवाल व अशोकनगर सोसायटीसमोर अनधिकृतपणे पत्राशेडचे अतिक्रमण वाढले आहेत.

Web Title: Encroachment of letter shed on Handewadi Road increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.