महामेट्रोचे फुटपाथवर अतिक्रमण, पादचाऱ्यांना त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:18 AM2018-11-08T02:18:03+5:302018-11-08T02:18:32+5:30
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महापालिकेच्या वतीने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी रस्त्यांची रुंदी कमी करून प्रशस्त फुटपाथ तयार करण्याचे काम सुरू आहे
पुणे : गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महापालिकेच्या वतीने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी रस्त्यांची रुंदी कमी करून प्रशस्त फुटपाथ तयार करण्याचे काम सुरू आहे; परंतु सध्या शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांसाठी महामेट्रो कंपनीने जागोजागी फुटपाथवरच अतिक्रमण केले असून, फुटपाथची रुंदी कमी केली आहे. यामुळे मात्र सध्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून चालण्यास भाग पडत आहे.
महामेट्रोकडून शहरात पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरूआहे. या मेट्रो कॉरिडॉरमध्ये कर्वे रोड, शिवाजीनगर, आरटीओ रोड परिसरात महामेट्रोकडून फुटपाथची रुंदी कमी करण्यात आली असून त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामामुळे एकीकडे पुणेकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे मेट्रोच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचे फुटपाथवरून चालणे देखील कठीण झाले आहे. कर्वे रोड परिसरात मेट्रो फुटपाथवर काही ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात आले आहे. मेट्रोचे बांधकाम साहित्य नित्यनियमाने फुटपाथवर टाकण्यात येत आहे. पौड रोड येथे तर महामेट्रोने आपले कार्यालयच फुटपाथवर थाटले आहे.
महामेट्रो आणि महापालिका सयुक्तरीत्या नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मिळावे यासाठी नियोजन करीत आहे. ज्या ठिकाणी फुटपाथ नाही, त्याठिकाणी महामेट्रोकडून फुटपाथची निर्मिती करण्यात येत आहे. ज्याठिकाणी फुटपाथ फुटलेले आहेत, त्यांची दुरुस्ती महामेट्रोकडून करण्यात येत असल्याचे रिच २ चे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.