मालोजीराजे गढी अतिक्रमण; समाधीस्थळ दुरावस्थेबाबत पडळकरांच्या नेतृत्वखाली सकल हिंदू समाजाने उठवला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:34 IST2025-04-24T19:33:37+5:302025-04-24T19:34:16+5:30
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तब्बल अडीच तास चाललेले रास्ता रोको आंदोलन स्थगित

मालोजीराजे गढी अतिक्रमण; समाधीस्थळ दुरावस्थेबाबत पडळकरांच्या नेतृत्वखाली सकल हिंदू समाजाने उठवला आवाज
इंदापूर: वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर पुन्हा मेघडंबरीसह समाधी उभारण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानंतर आ. गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवर तब्बल अडीच तास केलेले रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाने स्थगित केले.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी व महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर, सागर बेग व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे आज सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला.
पडळकर म्हणाले, विशाळगड, प्रतापगड गडाच्या धर्तीवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील सर्वच्या सर्व अतिक्रमण काढली जावीत. वीरश्री सरदार मालोजी राजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनाचा आराखडा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना दाखवणे आवश्यक होते. हजरत चाँदशाहवली यांचा दर्गा वेगळा ठेवण्यात यावा. मालोजीराजे भोसले यांची गढी व दर्गा यामध्ये भिंत बांधण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. पुणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागांवर बांधण्यात आलेले बेकायदेशीर दर्गाह तोडण्यात यावेत अशी मागणी ही त्यांनी केली.
दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेनुसार, गढीच्या परिसराची मोजणी करुन सीमांकन व हद्द निश्चित होत नाही. तोपर्यंत त्या ठिकाणच्या दुरुस्ती व सुशोभकरणाचे कामकाज थांबवण्याची सूचना संबंधित यंत्रणेस दिली आहे. दि.२९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी गढीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. तेथे मागण्यांच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाही करणयाबाबत चर्चा केली जाईल, असे पत्र तहसीलदार जीवन बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.