पुणे-सातारा महामार्गावर अतिक्रमणांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:56+5:302021-09-15T04:14:56+5:30
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यानच्या सेवा रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे राजगड पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ...
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यानच्या सेवा रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे राजगड पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायंस इन्फ्रा या ठेकेदारांच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आली होती, मात्र भोर व हवेली तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सेवा रस्त्यावर दिवसा हॉटेलचे फलक, हॉटेल्स पार्किंग, तर रात्रीच्या चहाच्या टपऱ्या सर्रास सुरू असतात अनेक ठिकाणी सेवा रस्ता हा पार्किंग म्हणून वापरला जात आहे, याठिकाचा सेवा रस्ता कोणी गिळला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या सेवा रस्त्यावर रात्रीच्या टपऱ्या सुरू असतात, तर भरदिवसा हॉटेलचे फलक रस्त्याच्या मधोमध उभे केले असतात, परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स इन्फ्रा व महामार्गाचे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वेळू उड्डाणपुलानंतर ते खेड-शिवापूर टोलनाका येथील असलेला सेवा रस्ता व मुख्य रस्ता यामधील दुभाजक फोडण्यात आले असून, ही बाब संबंधित प्रशासनाला दिसत नाही, हे विशेष!
सेवा रस्त्यावरील इतर ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र व्यावसायिकांचे बोर्ड असल्याने भविष्यात अपघात होऊ शकतो, अशी अतिक्रमणे का हटविले जात नाहीत किंवा संबंधित लोकांवर कारवाई का होत नाही अशी चर्चा आता शिवगंगा खोऱ्यात जोर धरू लागली आहे.
--
आम्ही कारवाई करीत आहोतच. मात्र पुन्हा अतक्रिमण केले जाते, केवळ अतिक्रमण काढून चालणार नाही तर रितसर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी महामार्ग पोलीसांचे सहकार्य अपेक्षित आहे, मात्र ते होत नाही.
अभिजित गायकवाड,
अधिकारी, महामार्ग पेट्रोलिंग
--
फोटो क्रमांक : १४
फोटो ओळी पुणे-सातारा माहामार्गावरील सेवा रस्त्याच्या मध्यभागी व्यावसायिकांना केलेले अतिक्रमण.
---